काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळेच देशात पीएफआयसारख्या संघटना उदयास आल्या आहेत. त्यामुळे देशात अशा संघटनांची वाढ होणे हा काँग्रेसच्या तुष्टीकरण धोरणाचा परिणाम असल्याचा आरोप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलाय.
विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. काँग्रेस सरकारच्या काळात पीएफआयवरील खटले मागे घेण्यात आले याला सर्वजण साक्षी आहेत. या संघटनेने पक्षाच्या आमदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्यावरील खटले मागे घेण्यात आले. यासारखे दुसरे तुष्टीकरणाचे राजकारण नाही. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच अशा संघटनांचे पेव फुटल्याची टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
यावेळी दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांनी पाहिलेल्या विजापूर जिल्ह्याच्या विकासाच्या स्वप्नाचे स्मरण करत त्यांनी पाहिलेले स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेवरदेखील निशाणा साधत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात देशाचे दोन तुकडे झालेले अजूनही जनता विसरली नसल्याचे सांगितले. काँग्रेस आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भारत जोडो पदयात्रा आयोजित करत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी सी. एम. इब्राहिम यांच्या विधानावरदेखील प्रतिक्रिया देत, इब्राहिम हे लग्न आणि घटस्फोट तज्ज्ञ असल्याचा टोलाही लगावला. शिवाय हि एक गंभीर समस्या असल्याचेही ते म्हणाले.


Recent Comments