डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्याना पराभूत करण्याचा निर्धार भाजप आणि रमेश जारकीहोळी यांनी केला आहे अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी आज बेळगावात दिली.
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानच केपीसीसी कार्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर छापेमारी केल्याबद्दल बेळगावात आज गुरुवारी पत्रकारांशी बोलताना कटील यांनी हा गौप्यसोट केला. सीबीआय सगळ्यांचीच चौकशी करते. आपण बरोबर असल्यास भीती कशाला बाळगायची? असा सवाल त्यांनी केला. या छाप्याना, चौकशीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. त्यांच्या सत्ताकाळातही सगळ्यांची चौकशी झाली होती. म्हणून सगळे घाबरले का? नरेंद्र मोदी यांची नऊ तास चौकशी करण्यात आली होती. अमित शहा यांना तुरुंगात डांबण्यात आले. तेंव्हा आम्ही आंदोलन केले, रस्त्यावर उतरून लढा दिला. पण यांची गंमत पहा, जेलमध्ये जाणार म्हटल्यावर हे कायदेशीर मार्गाने यात्रा काढतात. जेलमध्ये जाताना आणि बाहेर येताना यात्रा-मिरवणूक काढण्याचा नवा प्रयोग त्यांनी सुरु केलाय. दुसरे म्हणजे आयटी रेड पडल्यावर लोक गोळा करून अन्याय झाल्याची आवई उठवतात. हे लोक कायद्याला मान देतात का असा सवाल त्यांनी केला.
गुजरातबरोबरच कर्नाटकात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याचा दावा कटील यांनी फेटाळून लावला. कोणत्याही परिस्थितीत गुजराटसोबत कर्नाटकात विधानसभा निवडणूक होणार नाही असा ठाम दावा त्यांनी केला. आम्हाला निवडणुकीची भीतीही नाही आणि घाईही नाही. विद्यमान भाजप सरकार राज्यात आपली मुदत पूर्ण करेल असे ते म्हणाले. मुख्यमंत्री व्हायची घाई लागून राहिलेल्या डीके आणि सिद्दरामय्यांना मात्र निवडणुकीची घाई लागली आहे असा आरोप त्यांनी केला.
रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यात भाजप निवडणुकीला सामोरे जाणार का? या प्रश्नावर कटील यांनी, याबाबत मी कालच गोकाकमध्ये स्पष्ट सांगितले आहे असे उत्तर देत रमेश जारकीहोळी यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवू असे संकेत दिले. आम्ही सगळे मिळून निवडणुकीला सामोरे जाऊ आणि जिंकू. ‘आमचे आणि सतीश जारकीहोळी यांचे लक्ष्य एकच आहे’ असे बोलण्याच्या भरात सांगितल्यावर चूक लक्षात आल्यावर कटील यांनी सतीश जारकीहोळी यांच्यावर टीका करून करून तोंडात त्यांचे नाव आले, आमचे आणि रमेश, भालचंद्र जारकीहोळी यांचे लक्ष्य एकच आहे ते म्हणजे, आगामी निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील सर्व १८ आणि राज्यातील १५० जागा जिंकणे, डीके-सिद्दरामांचा पराभूत करणे हे आहे असे कटील यांनी स्पष्ट केले.
रमेश जारकीहोळी मंत्री होणार का? या प्रश्नावर तो निर्णय मुख्यमंत्र्यानी घ्यायचा आहे. भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली आहे का या प्रश्नावर, त्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढली आहे असा त्याचा अर्थ होतो. पण इच्छुक वाढले म्हणून विद्यमान आमदारांना बदलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
रा. स्व. संघावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना, बंदी घातलीच तर ती काँग्रेसवर घातली पाहिजे. काँग्रेसमुळेच आज देशात पीएफआय, एसडीपीआयसारख्या संघटना आणि त्यांच्या दहशतवादी कारवाया वाढल्या. या संघटनांना काँग्रेसनेच कुमक दिली. काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर देशात राज्य केले तर देशाचे नुकसान होईल हे महात्मा गांधींनाही माहित होते. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसचे विसर्जन करण्याची भूमिका मांडली होती. नंतर काळाच्या ओघात अशा दहशतवादी संघटनांना बळ देण्याचे काम सिद्दरामय्या सारख्यांनी केले. गोमातेला मारणाऱ्यांना, दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना त्यांनी संरक्षण दिले. याचा त्यांनी विचार करावा असा टोला कटील यांनी हाणला.


Recent Comments