कोणी कितीही गरिबी असला तरीही आजच्या काळात शिक्षणाची नितांत गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे आवाहन केपीसीसीचे कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी केले.


कर्नाटक राज्य नदाफ पिंजार संघ बेळगाव तालुक्याच्या वतीने गांधीनगर येथील बंटर भवन येथे आज रविवारी तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला. यावेळी एसएसएलसी व पीयूसी परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, तुमच्या मुलांना काम करून चांगले शिक्षण देताय याचा खूप आनंद होत आहे. आपल्या समाजातील अनेक विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर चांगले गुण मिळाले असून या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तुम्ही करत असलेल्या कामातून दुसऱ्या कामात बदल झाला पाहिजे.

सरकारी, खासगी काम, उद्योग, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांत ओळख निर्माण झाली पाहिजे. पूर्वी पूर्वजांना एकच काम करायचे होते. आता तशी गरज नाही. त्यामुळे मुलांचे चांगले संगोपन करण्याचा प्रयत्न करा असे त्यांनी सांगितले.
या नंतर बोलताना कर्नाटक राज्य नदाफ पिंजार समाजाचे जिल्हाध्यक्ष नजीर अहमद शेख यांनी, कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री होण्यासाठी पात्र असलेल्या सतीश जारकीहोळी यांनी मनाशी ठरवले तर आपला समाज पुढे जाऊ शकेल. आमच्या समाजाला बेळगाव तालुक्यात कुठेही 10 गुंठे जमीन द्यावी. तसेच गेल्या चार ते पाच वर्षांपासून महामंडळाच्या स्थापनेसाठी आम्ही लढा देत आहोत.
कृपया त्यासाठी मदत करा, नदाफ समाजातील एक व्यक्ती आमदार व्हावी, अशी इच्छा आहे. आपण केपीसीसीचे कार्याध्यक्ष आहेत, आमच्या समाजातील कोणत्याही व्यक्तीला राज्यात कुठेही उमेदवारी द्या असे आवाहन त्यांनी सतीश जारकीहोळी यांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष हजरतसाब नदाफ होते. समाजाचे नेते सिद्दीक अंकलगी, मुदस्सर नदाफ, जावेद नदाफ, प्राचार्य डॉ. एच. आय. तिम्मापूर, रफिक नदाफ, शमीना नदाफ, हाफिज रहमतुल्ला शेख आदी उपस्थित होते.


Recent Comments