Belagavi

विधानसभेत आम. महांतेश दोड्डागौडर यांचा आग्रह

Share

तिगडी हरीनाला येथील रस्त्यांची अतिवृष्टीमुळे दुरवस्था झाली आहे. येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी सभागृहात केली.

 

विधिमंडळ अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या सत्रात सहभागी झालेले आमदार महांतेश दोड्डगौडर म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून मुसळधार पावसामुळे हिरेमेळ, हन्नीकेरी, नवलगट्टी गावात अतिवृष्टीमुळे रस्त्यांची चलन उडाली आहे. या गावात बससेवा देखील सुरु नाही.

शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागत असून याप्रकरणी मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना आदेशही दिले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कोणत्याही कामासाठी पुढाकार न घेतल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

यावर उत्तर देताना पाटबंधारे विभागाचे मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, सहा रस्त्यांचे बांधकाम करण्यास सांगितले असून, त्यापैकी तीन रस्ते ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत येणार आहेत. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एनआरजी अंतर्गत तीन रस्ते करण्याचे सुचविले आहे. आणखी तीन रस्ते पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतात. मात्र निधीअभावी रस्ता तयार होऊ शकला नाही. यात अधिकाऱ्यांची काही चूक नसून काम एनआरजीमध्ये करण्याची सूचना जिल्हा पंचायत सीईओंना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

गोविंद कारजोळ यांच्या उत्तरावर समाधान न मानता आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी तिगडी नाल्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना केली. एनआरजी अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती होणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. त्याठिकाणी बस पोहोचू शकत नाहीत त्यामुळे सदर रस्त्याचे कामकाह पाटबंधारे विभागांतर्गत करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना गोविंद कारजोळ म्हणाले, पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील रस्ते हे केवळ कालव्याच्या देखभालीसाठी, सर्व्हिस रोड म्हणून निर्माण करू होऊ शकतात.

याठकाणी बस, ट्रॅक्टर व इतर वाहने चालवण्यास मनाई आहे. त्यामुळे जिल्हा पंचायतीच्या एनआरजी अनुदानातून आम्ही रस्ता तयार करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Tags:

POILITICS