भाजपला जिंकण्याचा विश्वास होता तर जेडीएसमधून उमेदवार का बोलावला? पक्षाचा उमेदवार जिंकणार नाही म्हणूनच भाजपने बसवराज होरट्टी पक्षात घेत उमेदवारी दिली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला.
वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात बुधवारी काँग्रेसचा मेळावा झाला. यावेळी बोलताना डीकेशी म्हणाले, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, हासनमध्ये एक शिक्षक आणि एक पदवीधर मतदारसंघ निवडणूक होत आहे. हासनमध्ये जेडीएसचे ७ तर मंड्यामध्येही ७ आमदार आहेत. म्हैसूरमध्ये जेडीएसचे ४ आमदार आहेत. आमचे ८ अन भाजपचे ५-६ आमदार आहेत. १७ जण असूनदेखील विद्यमान विधान परिषद सदस्यांना भाजपने रिंगणात उतरविलेले नाही. पराभवाच्या भीतीनेच त्यांनी नवा उमेदवार आयात करून निवडणूक रिंगणात उतरवला आहे. अशाचप्रकारे येथे देखील आमच्या प्रश्नांवर भाजप एमेलसींनी आवाज उठवलेला नाही असा आरोप मतदार करत असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. 
डिकेशी पुढे म्हणाले, सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार देण्यातही भाजप सरकारने भ्रष्टाचार चालविला आहे. पीएसआय, प्राध्यापक यासह अन्य पदांच्या नियुक्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत आहे. पैसे न दिल्यास कुठलीच नोकरी मिळत नाही. ४० पर्सेंट कमिशनमुळे बेळगावातल्याच भाजपच्याच कार्यकर्त्याने आत्महत्या केली आहे. अशा सरकारच्या प्रतिनिधींना मते द्यायची का? असा मोठा प्रश्न पडला आहे. शेतकरी, कामगार, सैनिक आणि शिक्षक हे या देशाचे ४ आधारस्तंभ आहेत. ते नसतील तर देशाची प्रगती करणे शक्य आहे का? आईलासुद्धा गुरूचा दर्जा मिळालेला आहे. आमच्या शिक्षणव्यवस्थेसाठी देशात आणि राज्यात देखील ३७% निधी राखून ठेवला जातो. पण त्यात कशाप्रकारे भ्रष्टाचार केला जातोय हे सगळ्यांना माहित झाले आहे अशी टीका शिवकुमार यांनी केली. 
बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, प्रकाश हुक्केरी हे हाडाचे कार्यकर्ते आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे. आता शिक्षकांसाठी काम करणार आहेत, शिक्षकांचे प्रश्न सोडवणार आहेत. पदवीधर मतदारसंघातून सुनील संक आणि शिक्षक मतदार संघातून प्रकाश हुक्केरी हे दोघेही निवडून येतील यात काही शंका नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी आणि सुनील संक यांनी यावेळी आपल्याला निवडून दिल्यास, पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, तुमच्यासाठी सदैव तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
या मेळाव्यात काँग्रेसच्या प्रचार समितीचे राज्याध्यक्ष एम. बी. पाटील, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, ईश्वर खांडरे, माजी मंत्री विनय कुलकर्णी, आ. डॉ. अंजली निंबाळकर, महांतेश कौजलगी, गणेश हुक्केरी, एमएलसी चन्नराज हट्टीहोळी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह काँग्रेस नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments