Belagavi

वैभवनगरात पुन्हा पाणी समस्या; रिकाम्या घागरी घेऊन रहिवाशांचा रास्ता रोको

Share

गेल्या आठवडाभरापासून बेळगावातील वैभवनगर परिसराला पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ   रहिवाशांनी आज सकाळीच हातात रिकाम्या घागरी घेऊन रास्ता रोको पुकारला आहे.

होय, वैभवनगर या बेळगावच्या विस्तारित वसाहतीत पाणी पुरवठ्याची समस्या वारंवार उदभवत आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी याच्या निषेधार्थ रास्ता रोको करून जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर काही दिवस सुरळीत पाणीपुरवठा झाला. मात्र पुन्हा गेल्या आठवडाभरापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने येथील रहिवाशांचे हाल सुरु झाले आहेत. त्यामुळे आज, सोमवारी सकाळी रहिवाशांनी रिकाम्या घागरी हातात घेऊन रास्ता रोको केला. रस्त्यावर ओळीने घागरी मांडून महिलांनी ठाण मांडले. त्याला मुले आणि पुरुषांनीही साथ दिली.

यावेळी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या आणि एल अँड टीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन निदर्शकांची भेट घेतली. पाणी समस्या सोडवू, तुम्ही आंदोलन मागे घ्या अशी निदर्शकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका निदर्शकांनी घेत आंदोलन सुरूच ठेवले. या रास्ता रोकोमुळे या परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तब्बल आठवडाभर पाणी पुरवठा न झाल्याने निदर्शक महिलांनी पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या एल अँड टी कंपनीच्या आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.

Tags: