Belagavi

पावसामुळे पिके नष्ट झाल्याने शेतकरी संकटात

Share

एकीकडे पाऊस झाल्याचा आनंद तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेली भाजीपाला पिके खराब झाल्याचे दुःख अशा संकटात बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे.

होय, गेल्या २-३ दिवसांत बेळगाव शहर आणि तालुक्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामाची पेरणीपूर्व कामे करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परंतु कष्टाने पिकवलेली विविध प्रकारची भाजीपाला पिके पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खास करून बेळगाव तालुक्यातील व शहर परिसरातील शिवारांत पाणी साचल्याने येथील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

बेळगाव शहरातही शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शहर आणि ग्रामीण परिसरातील हलगा, मच्छे, येळ्ळूर, बसवण कुडची, कडोली, उचगाव आदी ठिकाणच्या शिवारांमध्ये शेतकऱ्यांनी घाम गाळून कष्टाने पिकवलेल्या मिरची, टोमॅटो, कोथिंबीर व पालेभाज्या अशा पिकांचे पावसाने नुकसान केले आहे. एकरी किमान ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कर्ज काढून घेतलेली हाती आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात या पावसाने पाणी आणले आहे. ज्वारी, मका अशा कंपनी करून ठेवलेल्या पिकांवरही पावसाचा विपरीत परिणाम झाला आहे. शेतात आणि घरांमागे साठवून ठेवलेल्या गवत गंज्यांवर पाऊस पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने तयार पिके कुजून नष्ट झाली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने पीक नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

Tags: