Belagavi

फेक न्यूज प्रसारमाध्यमांसमोर मोठे आव्हान : बी. के. श्रीनिधी

Share

सोशल मीडिया आणि ऑनलाईन मीडियावर येणाऱ्या फेक न्यूज आजच्या प्रसारमाध्यमांसमोर मोठे आव्हान बनून राहिल्या आहेत असे मत ब्रह्माकुमारी पीस ऑफ माईंड टीव्हीचे अँकर राजयोगी बी. के. श्रीनिधी यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अध्यात्मिक सबलीकरणासाठी दया आणि करुणा’ या विषयावर पत्रकारांसाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. बेळगावातील महांतेश नगरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयात मंगळवारी हा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना बी. के. श्रीनिधी म्हणाले, देशात प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य असल्याने चुकीचेसुद्धा बरोबर म्हणून भासविण्याची शक्ती आमच्या आचार-विचारात आहे. पूर्वीची पत्रकारिता इतकी परिणामकारक होती की, न्यायालयाच्या निकालांवरदेखील त्याचा परिणाम होत असे. पत्रकार जी बातमी देतात त्यावरून लोक आपले निर्णय, दृष्टिकोन ठरवीत असत. मात्र आमच्यावर कसलेच सक्तीचे नियम, बंधने नसल्याने त्याचा विपरीत परिणाम आज आम्ही पहात आहोत. समाज माध्यमे, ऑनलाईन मीडियाच्या आजच्या युगात त्याचा परिणाम तत्काळ पडताना दिसतो. फेक म्हणजेच बनावट बातम्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अशा खोट्या बातम्यांपासून खूप सावध रहावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी बोलताना श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे म्हणाले, पूर्वीच्या काळात पत्रकारांना घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन खातरजमा करून घेऊन बातम्या द्याव्या लागत. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे काम थोडे सोपे झाले असले तरी, बातम्यांची सत्यासत्यता तपासणे आव्हान बनले आहे. पत्रकारांकडे समाज आता वेगळ्या नजरेने पाहतो आहे. हे चित्र बदलले पाहिजे. पत्रकारांनी नकारात्मक बातम्या देणे टाळले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी बेळगाव उपविभागाच्या संचालिका राजयोगी बी. के. अंबिका होत्या. कर्नाटक पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष मुरुगेश शिवपुजी, राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत काकतीकर, व्हिडिओ जर्नालिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महेश विजापुरे, बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Tags: