प्रशासन आणि राजकारण दोन्ही जनतेच्या बाजूचे असले पाहिजे. राजकारणात पीपल्स पॉलिटिक्स आणि पॉवर पॉलिटिक्स असे २ प्रकार आहेत. सत्तेत असताना ज्यांनी स्वतःसाठी योजना आखल्या त्यांच्याइतके देशाचे नुकसान अन्य कोणी केले नाही अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विरोधकांवर केली.

बंगळुरात विधानसौधमधील बँक्वेट हॉलमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री बोम्मई यांनी ‘हॅल्लो महसूल मंत्री’ या ७२ तासात पेन्शन मंजुरीसंदर्भातील सहायवाणीचे लोकार्पण केले. त्यानंतर बोलताना बोम्मई म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या समस्यांवर विधानसभेत चर्चा करतो, विरोधक शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळतात. या दोन्हीमध्ये मोठा फरक आहे. जनतेत राहिल्यासच जनपर प्रशासन देता येते असे ते म्हणाले. यावेळी ऍसिड हल्ल्यातील जखमींच्या पेन्शनची रक्कम ३ हजारवरून १० हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली. घरांसंदर्भात उद्यापर्यंत आदेश जारी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. स्वसहाय संघांना ५ लाखांपर्यंतचे कर्ज देण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन बोम्मई यांनी दिले. 
राज्यात लोकांना आवश्यक सरकारी कागदपत्रे, उतारे, दाखले देण्याच्या व्यवस्थेत कोणीही सुधारणा केली नव्हती. लोकांच्या घरांपर्यंत जाऊन दाखले देण्याची व्यवस्था आमच्या सरकारने केली आहे. हे सत्तेचे, अधिकारांचे विकेंद्रीकरण आहे. प्रशासन, सरकार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ते आम्ही करून दाखवले आहे असा दावा मुख्यमंत्र्यानी यावेळी केला. 
या कार्यक्रमाला महसूल मंत्री आर अशोक, आमदार एम कृष्णप्पा, रिझवान अर्शद, खासदार कुमारस्वामी, खासदार पी सी मोहन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, महसूल विभागाचे प्रधान सचिव अनिलकुमार, बंगळुरूचे जिल्हाधिकारी मंजुनाथ आदी उपस्थित होते.


Recent Comments