Belagavi

नेहरू नगरातील समस्यांमुळे महिलांचा एल्गार

Share

स्मार्ट सिटी होण्याकडे बेळगावची वाटचाल सुरु असली तरी अनेक ठिकाणी नागरी सुविधांची वानवा आणि गैरसोयीचे थैमान शहरात माजले आहे. नेहरुनगरातील नागरी समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी स्थानिक महिलांनी आज एल्गार पुकारला.

बेळगावातील नेहरू नगरात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. छोट्या पावसातही गटारी आणि ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचत आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांना कळवूनही काहीच उपयोग होत नाही. नेहरू नगरातील फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्रॉस हे भाग तर अनेक सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा, रस्ते, ड्रेनेज अशा अनेक समस्यांचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. नादुरुस्त रस्त्यांमुळे रहिवाशांना अपघातात जायबंदी व्हावे लागत आहे. याच्या निषेधार्थ स्थानी महिलांनी सोमवारी एल्गार पुकारला. रस्ता अडवून निदर्शने करत नगरसेवक, आमदार, स्मार्ट सिटी आणि पालिकेविरोधात आपला संताप व्यक्त केला.

यावेळी ‘आपली मराठी’सोबत बोलताना महिलांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून आम्ही येथे रहात आहोत. येथे अनेक नागरी समस्या असून त्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. येथील ड्रेनेज व्यवस्था कोलमडली आहे. किरकोळ पावसातही ड्रेनेज तुंबून पाणी रस्त्यावर येते. संडास, ड्रेनेजचे पाणी येथील देवस्थानात आणि घरांमध्ये घुसत आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे आमचे हाल होताहेत. नगरसेवक, आमदार निवडणुकीवेळी येऊन आश्वासने देतात, मते मागतात. पण निवडून आल्यावर इकडे ढुंकूनही पहात नाहीत असा संताप या महिलांनी व्यक्त केला. 

निदर्शनस्थळी येऊन पालिका आयुक्तांनी आमच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी करत महिलांनी रस्त्यावर ठाण मांडले. या दरम्यान पालिका अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर निदर्शनस्थळी येऊन महिलांची भेट घेतली. त्यांनी निदर्शक महिलांचे म्हणणे ऐकून घेऊन समस्या लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच महिलांनी आपली निदर्शने मागे घेतली. मात्र त्वरित समस्या न सोडविल्यास पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

एकंदर, नागरी सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी पालिका आणि स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी पार पाडली पाहिजे हेच खरे.

 

Tags: