संत बसवेश्वर महाराज यांच्या आदर्शांमुळे आपली प्रगती, उन्नती झाली असून १२ व्या शतकातील वचन साहित्य आजतागायत प्रत्येकासाठी उपयुक्त ठरत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी केले.

बेळगाव शहरातील शिवबसव नगर येथील लिंगायत भवन येथे अखिल भारतीय वीरशैव महासभा जिल्हा घटना आणि जगज्योती बसवेश्वर जयंती उत्सव केंद्र समिती तसेच विविध लिंगायत संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्री बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

३ मे रोजी बसवेश्वर जयंती असून या औचित्याने आजपासून विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंगला अंगडी, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर श्री बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात बोलताना खासदार मंगला अंगडी म्हणाल्या, ‘काम हीच पूजा’ अशी तत्वे आणि सिद्धांत सांगणाऱ्या श्री बसवेश्वर महाराजांचा जयंती उत्सव आज साजरा करण्यात येत असून संत बसवेश्वर महाराजांच्या तत्वांचे आदर्शांचे पालन प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अवश्य करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ बोलताना म्हणाले, यंदा संत बसवेश्वर जयंतीचे आचरण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षातील कोविड परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरे करण्यात आले नाहीत. परंतु यंदा मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत बसवेश्वरांनी १२ व्या शतकात सांगितलेले बोध आता पर्यंत प्रत्येकाच्या उपयोगी पडत आले असून त्यांच्या सिद्धांतानुसार प्रत्येकाने जगावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेल्या घटनेचा आज प्रत्येकाला फायदा होत आला असून देश आणि विशेषतः कर्नाटकात समानता असून अशीच तत्वे संत बसवेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितली आहेत. त्यांच्या तत्त्वांमुळे, सिद्धांतामुळे आपल्या साऱ्यांची उन्नती आणि प्रगती होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर खासदार मंगला अंगडी, अखिल भारत वीरशैव महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, बसव जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा ज्योती भाविकट्टी, आदी महिला मान्यवरांची उपस्थिती होती. हि महिला मान्यवरांची उपस्थिती पाहून जिल्हाधिकारी म्हणाले, आज व्यासपीठावर महिलांना मनाचे स्थान आहे. बसवेश्वर महाराजांनी लिंग समानतेसाठी आंदोलन केले. भारतात आज अनेक ठिकाणी उच्च पदावर महिला कार्यरत असून समानतेची वागणूक सर्वत्र नांदत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
या कार्यक्रमाला कारंजामठाचे श्री गुरिसिद्ध महास्वामी यांचे दिव्या सानिध्य लाभले होते. तसेच मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, उत्सव समितीच्या अध्यक्षा ज्योती भाविकट्टी, रमेश कळसन्नवर, घोळाप्पा होसमनी, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments