खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीच्या उगमस्थानी कणकुंबी येथे जेडीएस जनता जलधारे कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आलेल्या जेडीएसच्या खासदारांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढविला आहे. काँग्रेसच्या मेकेदाटू पदयात्रेवरून टोला लगावत हि पदयात्रा म्हणजे बिर्याणीची मेजवानी असल्याची टीका प्रज्वल रेवण्णा यांनी केली आहे.
खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीच्या उगमस्थानी, कणकुंबी येथील जेडीएस जनता जलधारा या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी आलेल्या प्रज्वल रेवण्णा यांनी काँग्रेस नेत्यांची खेचली असून राज्यातील सिंचन प्रकल्पसंदर्भातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जेडीएसतर्फे जनता जलधारा कार्यक्रम हाती घेतल्याचे ते म्हणाले. मलप्रभा नदीच्या पूजनानंतर जनता जलधारा कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यावेळी शंकर मुडलगी, नासिर बागवान आदींसह अनेक जेडीएस नेते उपस्थित होते. 
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रज्वल रेवण्णा यांनी राष्ट्रीय पक्षांकडून जनतेवर अन्याय होत असल्याची टीका केली. राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जनता जलधारा कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. म्हादई, मलप्रभा, कृष्णा, कावेरी यासह राज्यातील सर्व सिंचन प्रकल्पांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत राज्यात आणि केंद्रात त्यांचीच सत्ता असूनही म्हादई, कृष्णा, कावेरी प्रकल्पांच्या समस्यांसंदर्भात चर्चा होत नसल्याचे सांगत तामिळनाडू, आंध्रप्रदेश यासह कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात देखील जेडीएसची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपसह त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधत काँग्रेसने हाती घेतलेल्या पदयात्रांसंदर्भात त्यांनी चांगलाच टोला लगावलाय. गोवा निवडणुकीदरम्यान कर्नाटकाला एकही थेम्ब पाणी न देण्याचा पवित्रा घेण्यात आला असून काँग्रेसला म्हादई प्रकल्पासाठी आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही असे प्रज्वल रेवण्णा म्हणाले.
सिंचन प्रकल्प आणि योजनांसाठी अनेक आंदोलने पुढे येत असून राज्यातील निवडणुकीत या विषयावर कसे लक्ष केंद्रित करून मतदारांना आकर्षित करण्यात येईल, याकडे साऱ्याच पक्षांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीत सिंचन प्रकल्पांच्या मुद्द्यावरून पक्ष कोणती रणनीती आखतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Recent Comments