Belagavi

बेळगावात महामानवाला जयंतीनिमित्त अभिवादन

Share

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वर्ण करायचे तर समुद्राचे वर्ण केल्यासारखे होईल. समुद्राची खोली, विस्तार जसा कोणाला माहित नाही तशी बाबासाहेबांची विद्वत्ता, ज्ञान, सामाजिक कळकळ याचा वेध घेणे अजून कोणालाही जमलेले नाही असे उद्गार जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी काढले.  

बेळगावात गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासन आणि विविध दलित संघटनांच्या सहयोगाने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आंबेडकर यांच्या पुतळ्याला मंत्री गोविंद कारजोळ, खा. मंगल अंगडी, केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ व अधिकारी, अन्य मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. जयंतीनिमित्त दलित संघटनांनी आणलेल्या भीम ज्योतीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. सर्जू काटकर यांनी बाबासाहेबांवर लिहिलेल्या पुस्तिकेचे जिल्हा पालक  मंत्री गोविंद कारजोळ यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.

त्यानंतर बोलताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, बाबासाहेबांनी आमच्या समाजात जन्म घेऊनदेखील देशातील सर्व समाजांची काळजी घेतली. सर्वाना समान हक्क-अधिकार मिळावेत यासाठी श्रेष्ठ घटना लिहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील संसदेत प्रथम प्रवेश करताना संसदभवनाच्या पायऱ्यांवर डोके टेकून नमस्कार करत या देशात जर सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ कुठला असेल तर तो म्हणजे बाबासाहेबानी लिहिलेली राज्यघटना असे म्हटले होते याची आठवण मंत्री गोविंद कारजोळ यांनी करून दिली.

त्यानंतर बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ एकाच दिवसापुरती मर्यादित राहू नये. प्रत्येक घरात आंबेडकरांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे. त्यांचा आदर्श ठेवून समाज बदलण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. तरच बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके, प्रादेशिक आयुक्त अमलन आदित्य बिस्वास, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, शहर पोलीस आयुक्त डॉ एम. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महानगर पालिका आयुक्त डॉ.रुद्रेश घाळी, समाज कल्याण खात्याच्या सहसंचालिका उमा सालीगौडर, दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, दलित संघटनांचे अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी गोविंदा कारजोळ व अन्य मान्यवरांनी आंबेडकर नगरातील बुद्ध विहारला भेट दिली. त्याठिकाणी आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी आ. अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शहरातील धर्मवीर संभाजी चौकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात व मिरवणुकीमध्ये जिल्ह्यातील विविध भागातून हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Tags: