बेळगाव शहरात जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त महावीर जन्म कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे कोणत्याही विशेष कार्यक्रमाचे आचरण न करता महावीर जयंती अत्यंत साधेपणात साजरी करण्यात आली होती. मात्र यंदा बेळगाव मध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग तसेच महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने महावीर जन्मकल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार मंगला अंगडी, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, माजी आमदार संजय पाटील, जैन समाजप्रमुख गोपाळ जिनगौडर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार अभय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा पालकमंत्र्यांनी कवी चक्रवर्ती यांचे नाव अजरामर करण्यासाठी परिश्रम घेतले असल्याचे अभय पाटील म्हणाले, सत्य अहिंसा आणि शांती तत्वांचे पालन करण्यासाठी जैन धर्माचे मोठे योगदान आहे. महावीरांच्या तत्वांचे पालन करून उत्तम जैन होता येणे शक्य आहे. या समाजाच्या विकासासाठी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ हे सदैव तत्पर असतात असे आमदार अभय पाटील म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाला उद्देशून बोलताना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सत्य अहिंसा यासंदर्भात भगवान महावीर यांच्या दृष्टिकोनाबद्दल महत्व पटवून दिले. अहिंसा परमोधर्म: या तत्वानुसार महावीर जयंतीचे आचरण केले जाते. यापुढील काळात महावीर जयंती पंचकल्याण महोत्सव या नावाने साजरी केली जाईल, असा भरवसा त्यांनी दिला.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमदार अनिल बेनके म्हणाले, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर २ वर्षांनी मोठ्या उत्साहात भगवान महावीर जयंती साजरी होत आहे.या उत्सवाच्या निमित्ताने सर्व जैनबांधव एकत्रित येतात. तसेच जैन समाज हा एकोप्याच्या दृष्टिकोनातून आदर्श समाज असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, जैन समाजाचे नेते, मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते.


Recent Comments