Belagavi

ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासंदर्भात अद्याप चर्चा नाही : कारजोळ

Share

ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासंदर्भात येडियुरप्पा, अरुण सिंग आम्ही अद्याप चर्चा केलेली नाही असे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केले.

मंत्री ईश्वरप्पा याना आपल्या मृत्यूला जबाबदार ठरवून संतोष पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे. त्यावरून ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्या संदर्भात बुधवारी बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, पक्षाचे राज्य प्रभारी अरुण सिंग, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा व मी या संदर्भात अद्याप चर्चा केलेली नाही. आम्ही आपापल्या खोल्यांत आहोत. अजून तरी यावर कसली चर्चा झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाचा पोलीस तपास होऊ द्या, कायदेशीररित्या तपास पूर्ण होऊन सत्य बाहेर येऊ द्या, त्यानंतर दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र काँग्रेस नेते मनाला येईल तसे बोलत आहेत. त्यांनी सत्य-असत्य काय हे आधी समजून घेतले पाहिजे असे कारजोळ यांनी सांगितले. एकंदर संतोष पाटील आत्महत्येवरून मुख्यमंत्र्यांच्या आडून बहुतेक मंत्री ईश्वरप्पा यांची पाठराखण करताना दिसत आहेत. आता पोलीस तपासात यातून काय सत्य बाहेर पडते हे पहावे लागेल.

 

 

Tags: