हरित क्रांतीचे प्रणेते, माजी उपपंतप्रधान दिवंगत डॉ बाबू जगजीवनराम यांच्या ११५ व्या जयंतीचे आयोजन बेळगावमध्ये करण्यात आले होते.देशातील म्हण नेते, शोषितांच्या हक्कांसाठी परिश्रम घेऊन योगदान देणारे दिवंगत माजी उपपंतप्रधान डॉ बाबू जगजीवनराम यांच्या जयंती उत्सवाच्या ११५ व्या वर्षानिमित्त बेळगाव जिल्हा प्रशासन, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग, महानगरपालिका तसेच विविध दलित संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबू जगजीवनराम जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. राणी चन्नम्मा चौक ते सदाशिव नगर या मार्गावरून मिरवणूक मार्गस्थ होऊन बाबू जगजीवनराम गार्डन येथे मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत विविध कलापथकांनी सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा आणखीन वाढविली.


मिरवणुकीनंतर बाबू जगजीवनराम उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या कार्यक्रमास विशेष व्याख्याते म्हणून प्रकाश कट्टीमनी उपस्थित होते. यावेळी त्यांनी संविधान आणि आरक्षण या विषयावर व्याख्यान दिले. आरक्षण हा संविधानाचा एक भाग असून देशातील दलित समाजालाच केवळ आरक्षण देण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. डॉ. बाबू जगजीवनराम यांनी हरितक्रांती केली. आपणदेखील प्रगती आणि विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. बाबू जगजीवनराम यांनी वयाच्या २० व्या वर्षी बिहारमध्ये ५० ते ६० हजार जणांना घेऊन चळवळ उभी केली. त्या चळवळीत केवळ दलितच सहभागी झाले नव्हते तर ओबीसी समाज देखील मोठ्या संख्येने सामील झाला होता असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, डीसीपी रवींद्र गडाद, समाज कल्याण विभागाच्या सहसंचालिका उमा सालीगौडर, पालिका उपयुक्तता भाग्यश्री हुग्गी, दलित नेते मल्लेश चौगुले, बाबू पुजारी, यल्लाप्पा हुदली आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments