Belagavi

मातृभाषा मराठीचा झेंडा फडकत ठेवा : मारुतीराव सांबरेकर 

Share

वि. गो .साठे प्रबोधिनीचे २१ वे मराठी बालसाहित्य संमेलन उत्साहात 

 मातृभाषेमुळे मुलांवर संस्कार करणे सोपे होतेच, त्याशिवाय त्यांच्या शिक्षणाचा पाया घट्ट होतो असे विचार सामाजिक कार्यकर्ते मारुतीराव सांबरेकर यांनी व्यक्त केले.

बेळगावातील कॅम्पमधील गोगटे रंगमंदिरातील डॉ. अनिल अवचट साहित्यनगरीत वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे शनिवारी २१व्या मराठी बालसाहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या बालसाहित्य संमेलनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे मारुतीराव सांबरेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या नीला आपटे होत्या.

त्यानंतर पुढे बोलताना सांबरेकर म्हणाले, मातृभाषेतून शिक्षणामुळे विध्यार्थ्यांना विषयांचे आकलन सोपे होते. त्यामुळेच ज्येष्ठ समाजसेवक नाना शंकरशेठ यांनीही ब्रिटिशांच्या काळातच मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरला होता. मातृभाषेतून पुस्तके लिहून महिला शिक्षणाबाबतही त्यांनी जागृती निर्माण केली. विध्यार्थ्यानी चांगले संस्कार, शिक्षण घेऊन आई-वडिलांचे, समाजाचे नाव उज्ज्वल करा, मातृभाषा मराठीचा झेंडा फडकत ठेवा असे आवाहन त्यांनी केले.

मराठी विद्यानिकेतनच्या विध्यार्थ्यानी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मराठी अभिमानगीत सादर करण्यात आले. त्यानंतर डॉ. एन. डी. पाटील, लता मंगेशकर, रमेश देव, सिंधुताई सपकाळ, अनिल अवचट, बाबासाहेब पुरंदरे, सुधा नार्वेकर, अपर्णा व्यंकटेश याना श्रद्धांजली वाहण्यात आली. साठे प्रबोधिनीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. अथर्व गुरव आणि सौम्या पाखरे यांनी परिचय करून दिला. मारुतीराव सांबरेकर व अन्य मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने संमेलनाचे उदघाटन केले. नीला आपटे व अन्य मान्यवरांनी सावित्रीबाई फुले आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमांचे पूजन केले.

उदघाटन सत्रानंतर कथाकथन सत्र झाले. त्याचे सूत्रसंचालन छत्रू पाटील यांनी केले. त्यानंतर दुसरे सत्र कविसंमेलनाचे झाले. त्याचे सूत्रसंचालन बी. जी. शिंदे यांनी केले. तिसऱ्या सत्रात नीला आपटे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यावेळी मारुतीराव सांबरेकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. इंद्रजित मोरे यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले.

 

Tags: