Belagavi

बेळगावात गांजाच्या नशेचे वाढते प्रमाण; गांधीनगर बनले अड्डा

Share

 कुंदानगरी बेळगावात गांजाची नशा करण्याचे प्रमाण वाढत आहे. युवकांपासून अगदी लहान मुलांपर्यंत अनेकजण यात ओढले जात आहेत. गांजाविक्री होणाऱ्या भागात तर याचे मोठे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे पालकांची झोप उडाली आहे. याबाबत सादर आहे एक स्पेशल रिपोर्ट… 

कुंदानगरी बेळगाव हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. निसर्गरम्य परिसरामुळे हे शहर कोणालाही मोहात पाडते. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी बेळगावची निवड झाल्यावर तर येथे मोठी विकासकामे होत आहेत. मात्र त्या पाठोपाठ शहरात घडत असलेल्या काही घटनांमुळे येथील जनतेची झोप उडाली आहे. शहरातील युवावर्ग मोठ्या प्रमाणात गांजाच्या आहारी जात आहे. त्यामुळे गांजा, दारूची दुकाने, पेनी बंद करा अशी मागणी करत गांधीनगरातील स्थानिक महिला आता रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.

होय, कधी नव्हे इतका मादक पदार्थांच्या काळा धंदा बेळगावात फोफावलाय. गांधी नगरातील बेकायदा गांजा विक्रीने स्थानिकांची झोप उडवली आहे. गांधीनगर, उज्ज्वलनगर, आझादनगरसह न्यू गांधीनगर या वसाहती गांजा विक्रीचे अड्डे बनल्या आहेत. लहान मुलेही या व्यसनाला बळी पडत आहेत. गांजाची नशा करून काही युवक युवती-महिलांवर दादागिरी करत आहेत. त्यांच्या अंगावरील दागिने लुटून नेत आहेत. रात्री २ वाजेपर्यंत हे प्रकार सुरु असतात. अम्बली मार्केटमध्ये रात्री उशिरापर्यंत बसून गांजा पिऊन येथे येऊन हे गंजेडे, नशेडे दंगा घालतात. त्यामुळे येथून वावरणे महिलांना भीतीदायक झाले आहे. त्यामुळे तुम्हा ला हात जोडतो, पाया पडतो, पण या नशेडयांपासून आमचे रक्षण करा, असे सांगत महिलांनी निदर्शने करतच विनवणी केली आहे.

या भागात अलीकडेच कैफ बागवान नामक युकावर हल्ला करण्यात आला होता. ६ युवकांनी कैफवर तलवारीने प्राणघातक हल्ला करून जखमी केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच या भागात पुन्हा गुंडगिरी करून दहशत माजविण्याचा येत असल्याचा या महिलांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळी हातात तलवारी घेऊन येणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या युवकांमुळे महिलांना या भागात फिरणे भीतीचे ठरत आहे. पर्वा आमच्या नातवावर हल्ला करण्यात आला. तशी वेळ कोणावर येऊ नये असे एका महिलेने हात जोडून सांगितले.

कैफ बागवानवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद या परिसरात उमटले. या हल्ल्याचा निषेध करत यामागे मुश्ताक नामक एका गुंडाचा हात आहे, अशा समाजकंटकांना पकडून गांधीनगर नशामुक्त करा, या भागात सुख-शांती निर्माण करा अशी मागणी येथील महिलांनी शहा पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

पोलीस आयुक्तांना निवेदन दिल्यानंतरही या भागात गुंडांची दहशत वाढतच आहे. गरिबांच्या मुलांना ते वाम मार्गास लावत आहेत. त्यांना पायबंद घाला, आयुष्यात पुन्हा असे धाडस त्यांनी करू नये अशी कठोर शिक्षा त्यांना द्या अशी मागणी महिलांनी केली आहे.

एकंदर, गांधीनगर परिसरात गांजेबाज गुंडांची दहशत वाढली आहे. निष्पाप युवकांना ते व्यसनी बनवत आहेत. महिलांना सायंकाळनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे या गुंडांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

 

 

Tags: