बेळगाव शहरात सुरु झालेल्या जय किसान खाजगी भाजी मार्केटचा वाद दररोज नवनवे वळण घेत असून या भाजी मार्केटच्या विरोधात शेतकरी नेते सिध्दगौड मोदगी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान आज आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात सुरु करण्यात आलेली खाजगी एपीएमसी बंद करून सरकारी एपीएमसी वाचविण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांनी छेडलेल्या या आंदोलनाने आज नवे वळण घेतले असून शेतकरी नेते सिध्दगौड मोदगी यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. (फ्लो)
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते सिध्दगौड मोदगी म्हणाले, सरकारने खाजगी एपीएमसी स्थापन करण्यासाठी दिलेली परवानगी हि बेकायदेशीर आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन, आणि सरकार दरबारी निवेदन देण्यात आले असून कोणतीही कारवाई अथवा पाऊल उचलण्यात येत नाही. खाजगी एपीएमसी मुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या होणाऱ्या अडचणींचा सरकारने विचार केला नाही. सरकारच्या या निर्णयाविरोधात आपण आंदोलन छेडले असल्याचे मोदगी म्हणाले. 
खाजगी एपीएमसीला परवानगी देण्याच्या निर्णयापूर्वी सरकारने जनतेचा अभिप्राय घेणे गरजेचे होते. आम्ही हा लढा शेतकऱ्यांच्या हितासाठी देत असून सरकारी एपीएमसी असूनही खाजगी एपीएमसी निर्माण करण्यास आमचा विरोध असल्याचे ते म्हणाले. खाजगी एपीएमसीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले.
यासंदर्भात जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांप्रती त्यांना काळजी नसल्याचे मोदगी म्हणाले. स्थानिक भाजप आमदार आणि जिल्हा पालकमंत्र्यांच्या या एपीएमसी निर्णयामध्ये हात असल्याचा आरोप मोदगी यांनी केला. बागलकोट जिल्ह्यातील गोविंद कारजोळ यांना बेळगावचे पालकमंत्री पद देण्यात आले असून त्यांना बेळगावमधील घडामोडींसंदर्भात कोणतीच माहिती नसल्याचेही मोदगी म्हणाले.
खाजगी एपीएमसीसंदर्भात व्यापारी सतीश पाटील बोलताना म्हणाले, ३ तारखेपासून अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. यादरम्यान सिद्धंगौडा मोदगी यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. सरकारी एपीएमसी ऑपरेटर्सचा आपल्याला संपूर्ण पाथुम्बा आहे. परंतु जिल्हाप्रशासन आणि लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांविषयी जाणीव नाही. आमच्या आंदोलनाची दखल सरकार आणि जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असा आग्रह त्यांनी यावेळी केला.
यासंदर्भात व्यापारी गजानन शहापूरकर बोलताना म्हणाले, बेळगाव शहरात खाजगी भाजी मार्केट ला विरोध करण्यासाठी सरकारी भाजी मार्केट ऑपरेटर्सकडून आंदोलन छेडण्यात आले आहे. भारतीय कृषी समाजाच्या वतीने शेतकरी नेते सिध्दगौड मोदगी यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे. सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन खाजगी एपीएमसी बंद करावी, तसेच खाजगी एपीएमसीची परवानगी रद्द करावी अशी मागणी गजानन शहापूरकर यांनी केली.
बेळगावमधील खाजगी एपीएमसी विरोधातील वाद आता चिघळण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकरी नेते सिध्दगौड पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकार आणि लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुरुवातीला धरणे आंदोलन आणि आता आमरण उपोषणाची घोषणा यावर सरकार, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कशापद्धतीने प्रतिसाद देतात हे पाहणे गरजेचे आहे.


Recent Comments