स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात रविवारी रथसप्तमीनिमित्त बेळगावात रविवारी सामूहिक सूर्यनमस्कार अभियान पार पडले.
पतंजली योग समिती कर्नाटक, कृष्ण वलय बेळगाव शाखा, पतंजली योग शिक्षण अध्ययन आणि संशोधन केंद्र, तुमकूर, कन्नड आणि संस्कृती खाते, बेळगाव यांच्या सहयोगाने कुमार गंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात आज, रविवारी सामूहिक सूर्यनमस्कार अभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी योग अभ्यासकांनी १०८ सामूहिक सूर्यनमस्कार घातले. 
या संदर्भात बोलताना योग प्रशिक्षक कांचन अरुण कोपर्डे यांनी सांगितले की, रथसप्तमीला सूर्य आपला रथ बदलतो अशी धारणा आहे. त्यामुळे या दिवशी सूर्यापासून निर्माण होणारी कॉस्मिक सूर्यकिरणे अत्यंत शक्तिशाली असतात. वर्षभर पुरेल इतकी शक्ती या कॉस्मिक सूर्यकिरणांपासून या दिवशी मिळते. त्यामुळेच आज खास या सामूहिक १०८ सूर्यनमस्कार अभियानाचे आयोजन केले आहे असे सांगून यासाठी सहकार्य दिलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. 
यावेळी मैत्री ऑफिसर्स क्लबच्या अध्यक्षा मैत्री बिस्वास यांनी, सूर्यनमस्कार अभियानाचे आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आजकाल सर्वांचे जीवन तणावपूर्ण बनले आहे. अशावेळी सूर्यनमस्कार, योगाचा सर्व केल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यासह दैनंदिन जीवनातील ताण-तणाव दूर करण्यास मोठी मदत होते. रथसप्तमीला सूर्य आपली भ्रमणदिशा बदलतो. अशावेळी सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीराला सर्वाधिक फायदा होतो. लहान मुले, तरुण, स्त्री-पुरुष सर्वांनाच योग आणि सूर्यनमस्कारामुळे तंदुरुस्ती राखण्यास मदत मिळते असे सांगून त्यांनी या अभियानाबद्दल आयोजकांची प्रशंसा केली.
यावेळी कन्नड व संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विद्यावती बजंत्री, सीएआर एसपी सिद्दनगौडा पाटील यांच्यासह अनेक योग अभ्यासक उपस्थित होते.


Recent Comments