Belagavi

नरेगा कामगारांचा केदनूरात एल्गार ! ६ ग्रापं सदस्यांना कोंडून निदर्शने

Share

कामे दिली जात नसल्याच्या निषेधार्थ बेळगाव तालुक्यातील केदनूर येथे सोमवारी नरेगा कामगारांनी एल्गार पुकारला. सुमारे ६०० कामगारांनी ग्राम पंचायत सदस्यांना कोंडून ठेवत निदर्शने केली.

होय, आजचा दिवस केदनूर ग्राम पंचायतीच्या इतिहासात ‘न भूतो’ ठरला. ग्राम पंचायतीकडून नरेगा कामगारांना कामे दिली जात नसल्याने त्यांच्या पोटापाण्याची भ्रांत निर्माण झाली आहे. वारंवार विनंती करून, निवेदन देऊनही फरक पडत नसल्याने कामगारांनी आज एल्गार पुकारला. सुमारे ६०० कामगारांनी हातात कुदळ, पिकास, बुट्ट्या, फावडे घेऊन ग्रापं कार्यालयावर चाल केली. हे साहित्य ग्रापंसमोर ठेवून निदर्शने केली. दरम्यान कामगारांच्या या आंदोलनाची माहिती आधीच मिळाल्याने ग्रापं अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी पळ काढला होता. मात्र ६ ग्रापं सदस्य कार्यालयात होते. दाराला बाहेरून कडी लावून त्यांना कोंडून ठेवत कामगारांनी आंदोलन केले.

दरम्यान, कामगारांच्या आंदोलनाची माहिती मिळताच तालुका पंचायतीचे सहायक संचालक राजेंद्र मोरबद यांनी निदर्शनस्थळी येऊन कामगारांची भेट घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तुमच्यावरील अन्याय दूर केला जाईल, आता आंदोलन मागे घ्या असे आवाहन त्यांनी निदर्शक  कामगारांना केले.

यावेळी आपली भूमिका मांडताना निदर्शक कामगारांनी सांगितले की, वर्षातून किमान १५० दिवस काम देण्याचा नरेगा योजनेत नियम आहे. मात्र आम्हाला धड ५० दिवसही काम दिलेले नाही. एक दिवसाआड एनएमआर काढून देऊ असे सांगितले होते. मात्र तोही देण्यात आलेला नाही. काम केलेल्या मजुरांना पगार दिलेला नाही. ४ दिवसांत पगार देतो म्हटले. अजून आमच्यातील ३ संघांना काम देतो असे अधिकारी म्हणताहेत अशी कैफियत कामगारांनी मांडली.

दरम्यान, आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देत कामगारांनी आंदोलन मागे घेतले. पण त्याचवेळी आठवड्यात मागण्या पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 

 

 

Tags: