Belagavi

जारकीहोळी ब्रदर्सना वगळून मंत्री उमेश कत्ती यांनी घेतली गुप्त बैठक

Share

 बेळगावातील जारकीहोळी बंधूंना सामावून घेता मंत्री उमेश कत्ती यांनी गुप्त राजकीय बैठक घेतल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

होय, बेळगाव शहरातील शिवबसव नगरातील आपल्या निवासस्थानी मंत्री कत्ती यांनी शनिवारी सायंकाळी मोजक्या भाजप नेत्यांची गुप्त बैठक घेतल्याचे वृत्त आहे. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तार, निगम-महामंडळांच्या अध्यक्ष नियुक्त्या, बेळगाव पालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याचे समजते. या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आ. अभय पाटील, अनिल बेनके, महांतेश दौडगौडर, पी. राजीव, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ सहभागी झाले होते. यावेळी विविध मुद्द्यांवर जवळपास ३ तास प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. बैठकीला बेळगावातील काही वरिष्ठ पक्ष नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

मात्र माजी मंत्री व गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी, त्यांचे बंधू भालचंद्र जारकीहोळी यांना बैठकीला बोलावण्यात आले नव्हते असे समजते. जारकीहोळी ब्रदर्सना न घेता झालेल्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत आता राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा सुरु झाली आहे. बोम्मई मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे कळते. येत्या शिवरात्रीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील, कुडचीचे आ. पी. राजीव यांना मंत्रिपद तर आ. अनिल बेनके आणि आ. महांतेश दौडगौडर याना निगम-महामंडळाचे अध्यक्षपद द्यावे यासाठी मागणी करण्याचे बैठकीत ठरले आहे. बेळगावकरांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीची जबाबदार आ. अभय पाटील यांच्या खांद्यावर टाकण्याचे ठरविण्यात आले असल्याचे समजते. एकंदर बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात शक्तिकेंद्र असलेल्या जारकीहोळी ब्रदर्सना वगळून मंत्री उमेश कत्ती यांनी घेतलेल्या या बैठकीने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. राज्याच्या राजकीय पटलावर त्याचे काय पडसाद उमटतात याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष्य लागून राहिले आहे.

 

 

Tags: