बेळगाव जिल्हा इस्पितळात ३ मुलांचा गूढ मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे. या मुलांच्या पालकांनी आक्रोश करून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गलथानपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

होय, रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावातील १३ महिने वयाची पवित्रा हुलगूर, १४ महिन्यांची मधु करगुंडी आणि रामदुर्ग तालुक्यातीलच दीड वर्षांचा चेतन पुजारी अशी मृत मुलांची नावे आहेत. १२ जानेवारी रोजी बोचबाळ गावात सालहळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मुलांना रुबेला प्रतिबंधक लस दिली होती. हे इंजेक्शन घेऊन घरी गेल्यावर या ५ मुलांना उलट्या-जुलाब सुरु झाले. तातडीने त्यांना बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे ३ मुलांना आयसीयूत ऑक्सिजन सपोर्टवर ठेवून उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारांनी बरी होण्याऐवजी ३ मुलांचा गूढ मृत्यू झाला आहे. सालहळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी कोरोना लसीकरण आणि लहान मुलांना रुबेला प्रतिबंधक लसीकरण केले आहे. यावेळी मुलांना नेमकी कोणती लस दिली हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मृत मधु या मुलीच्या आजीने याबाबत रडतरडत सांगितले की, आजी-आजी म्हणून मधु माझ्या मांडीवर येऊन बसायची, दोनच दिवसात मी माझी नातं गमावली आहे. मधुच्या आईनेही रडत शोक व्यक्त केला. त्यानंतर ग्रापं सदस्य भीमशी वारीमनी यांनी सांगितले की, दरमहाप्रमाणे इंजेक्शन दिले असते तर हा वाईट प्रसंग कदाचित आला नसता. अंगणवाडी केंद्रात १२ जानेवारीला कोविड लसीकरण आणि लहान मुलांचे लसीकरण एकदाच घेण्यात आले. त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनीही सावधगिरी बाळगायला हवी होती. त्यांनी नेमके कोणते इंजेक्शन दिले हे माहित नाही रिपोर्ट आल्यावर ते कळेल. दोन्ही लसीकरण वेगवेगळ्या ठिकाणी केले असते तर ही परिस्थिती आली नसती. इंजेक्शन दिल्यावर ५ मुलांना त्रास झाला.
त्यापैकी ३ दगावली. उरलेली २ मुले बरी होतील असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मुलांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे आम्हाला समजायला हवे असे वारीमनी यांनी सांगितले. कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ म्हणाले, या मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र याबाबत कडक पावले उचलून, मुलांचा मृत्यू कशामुळे झाला याचे खरे कारण शोधून दोषींवर कारवाई करण्यात येईल. एकंदर, अद्याप जगही नीट न पाहिलेल्या या कोवळ्या जीवांचा हा दुर्दैवी मृत्यू मनाला चटका लावणारा आहे.


Recent Comments