बेळगावमधील युवा ब्रिगेडच्यावतीने प्रत्येक आठवड्यात समाजाभिमुख कार्य केले जाते. या आठवड्यात या ब्रिगेडच्यावतीने शहर आणि परिसरातील भिक्षुक आणि निराश्रितांचा शोध घेऊन त्यांचे रूप पालटवले आहे.

बेळगावमधील युवा ब्रिगेड संघटना हि अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात क्रियाशील असते. या आठवड्यात बेळगावमधील विविध रस्त्यांवर असलेल्या भिक्षुकांची तसेच निराश्रितांची शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. युवा ब्रिगेडच्यावतीने राहुल बेळगावी यांच्यावतीने भिक्षुकांचे मुंडन करण्यात आले. त्यांच्या अंघोळीची आणि कपड्यांची व्यवस्था करून भिक्षुकांचे स्वरूप पालटवण्यात आले. 
युवा ब्रिगेडच्या या अनोख्या उपक्रमांर्तगत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी असे अनेक उपक्रम हाती घेण्यात येतात. देवस्थान, बस स्थानकाची स्वच्छता करण्यात येते. भुकेल्यांना अन्न देण्यात येते. रात्री अपरात्री अडी अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यात येते.
या संघटनेच्या कार्यासंदर्भात माहिती देताना राहुल बेळगावी यांनी सांगितले कि, विकेंड कर्फ्यूदरम्यान युवकांना मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. आतापर्यंत ६ ते ७ लोकांचे पुनर्वसन आमच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अशा लोकांकडे समाजाचे दुर्लक्ष होते. समाजातील असे अनेक लोक आहेत जे रोगराईच्या विळख्यात अडकलेले आहेत. भारत विश्वगुरू म्हणून संबोधण्यात येतो. परंतु आता खऱ्या अर्थाने भारताला विश्वगुरू होण्याची आवश्यकता असल्याचे मत राहुल बेळगावी यांनी व्यक्त केले.
या उपक्रमात युवा ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments