Belagavi

आरसीयुच्या नव्या कॅम्पसची मुख्यमंत्र्यांच्याहस्ते कोनशिला

Share

बदलत्या काळाच्या गरज पूर्ण करण्यासाठी विद्यापीठांनी स्वयंसिद्ध होऊन पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील मलप्पनगुड्ड येथे १२६ एकर विस्तीर्ण जागेत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसची कोनशिला बुधवारी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते बसविण्यात आली. त्यानंतर त्यांनी संगोळ्ळी रायण्णा प्रथमदर्जा सरकारी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील इमारतीचे उदघाटन केले.

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, राणी चन्नम्मा विद्यापीठ जागतिक पातळीवर नावारूपाला आले पाहिजे. त्यासाठी सरकार हवे ते सहकार्य देईल. एक वर्षाच्या आत रस्ते, पाणी, इमारती आदी मूलभूत सुविधा पुरवून कॅम्पस उभारण्यात येईल. विद्यापीठाच्या प्रत्येक खोलीचे डिजिटलायझेशन करण्यात येईल. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात विद्यापीठ सुरु होत असल्याने पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात समस्या उदभवू शकेल. ती सोडविण्यासाठी पर्यायी योजना राबविण्यात येईल असे बोम्मई म्हणाले.

विद्यापीठांनी विद्यार्जनासाठी पूरक वातावरण निर्माण केले पाहिजे. आजचे जग ज्ञानाचे, माहितीचे आहे. ते जाणून घेऊन विद्यापीठांनी आजच्या काळाच्या गरज ओळखून शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी पुढाकार घेतला पाहिजे. नवनवीन आविष्कार घडविणारे शिक्षण द्यायला हवे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथनारायण, धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, ग्रामीण आ. लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य डॉ. साबण्णा तळवार, अरुण शहापूर, हणमंत निराणी, चन्नराज हट्टीहोळी, माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ, आरसीयूचे कुलगुरू डॉ. रामचंद्रेगौडा, कुलसचिव डॉ. बसवराज पद्मसाली आदी उपस्थित होते.

 

 

Tags: