Belagavi

गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांची कनकदास कॉलनीत भेट; संगोळी रायन्ना पुतळ्याला केले अभिवादन

Share

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर संगोळी रायन्ना तसेच जगज्योती बसवेश्वर यांचा अवमान करणाऱ्यांना ताब्यात घेतले असून अशी दुष्कृत्ये करणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही, असा इशारा गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी दिला.

मंगळवारी अनगोळमध्ये जीर्णोद्धार करण्यात आलेल्या क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र बोलत होते. यावेळी त्यांच्यासह दक्षिण आमदार अभय पाटील देखील उपस्थित होते.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणून आचरणात आणण्याची घोषणा केली आहे. ७५ वर्षानंतर स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या महान पुरुषांचा अवमान करणारे मानसिक रुग्ण आहेत, अशा शब्दात त्यांनी बेळगाव आणि बंगळूरमध्ये झालेल्या घटनांवर प्रतिक्रिया दिली.

आपल्या सुखासाठी छत्रपती शिवाजी महाराज, जगज्योती बसवेश्वर, क्रांतिवीर संगोळी रायन्ना, यासारख्या अनेक महापुरुषांनी बलिदान दिले आहे. हे महापुरुष कोणत्याही भाषेपुरते, जातीपुरते किंवा एखाद्या प्रदेशापुरते मर्यादित नाहीत. संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलिदान दिले आहे. बेळगावमध्ये कन्नड आणि मराठी भाषिक आनंदाने राहतात. परंतु काही समाजविघातक प्रवृत्तीनकडून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी अशा गोष्टी जाणीवपूर्वक घडविण्यात येत असून या घटनांचा मी निषेध व्यक्त करत आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी दिली.

महाराष्ट्रात कन्नड भाषिकांवर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांशी सातत्याने चर्चा होत असल्याचे आरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले. राज्यात झालेल्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या दोषींवर गुंडगिरी कायद्यांतर्गत तडीपार करण्याचा सल्ला देण्यात आला असून यावर विचार करण्यात येत असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Tags: