मराठा समाज विकास निगमच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निगमला अनुदान मंजूर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री आर. अशोक यांनी आज विधानसभेत दिली.

विजापूरचे आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री अशोक बोलत होते. आ. यत्नाळ यांनी हा प्रश्न उपस्थित करताना सभागृहाला सांगितले की, या देशात हिंदू धर्म टिकून राहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. औरंगजेब, टिपू सुलतान यासारख्या धर्मांधांपासून त्यांनी धर्म आणि देशाचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरे वाचवली, त्यांचा जीर्णोद्धार केला. तेच कार्य आज पंतप्रधान मोदी करत आहेत. शिव छत्रपतींसारखा महान राजा देशाला देणाऱ्या मराठा समाजाच्या विकासाकडे आजवर संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. मराठी भाषा वेगळी आणि मराठा समाज वेगळा हे सभागृहाने ध्यानात घ्यावे. माजी मुख्यमंत्र्यांनी या समाजाचा २-ए प्रवर्गात समावेश करण्याचे आणि मराठा समाज विकास निगम स्थापन करून २५० कोटी रुपये अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे किमान १०० कोटी रुपये तत्काळ मंजूर करून मराठा समाजाचे ऋण फेडले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
त्यावर उत्तर देण्यासाठी मंत्री आर. अशोक उठून उभे राहिले असता, काही आमदारांनी महाराष्ट्रात कन्नड ध्वज जाळल्याबाबतच्या बातम्यांची वर्तमानपत्रे सभागृहात दाखवली. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. त्यावर सभाध्यक्ष विश्वनाथ हेगडे-कागेरी यांनी हस्तक्षेप करून सदस्यांना शांत केले.त्यानंतर बोलताना महसूल मंत्री आर. अशोक म्हणाले, निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने याबाबत काही करता आलेले नाही. हा विषय मराठी भाषेचा नसून मराठा समाजातील मागासांच्या विकासाचा आहे. मागास मराठा समाजाला न्याय मिळावा हीच सरकारची भूमिका आहे. लवकरच मराठा समाज विकास निगमच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल, बसनगौडा पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, चर्चा करून निगमला अनुदान मंजूर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली.
एकंदर, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. आता गरज आहे ती प्रत्यक्ष आश्वासन पूर्ततेची.


Recent Comments