शालेय विध्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासोबत अंडी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला काहींनी विरोध करून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी कोणत्याही परिस्थितीत निर्णय रद्द न करता अंडी देण्याची मागणी केली आहे.
होय, शालेय माध्यान्ह आहारात अंडी देऊ नयेत यासाठी बेळगावात शाकाहारी नागरिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्याची धूळ उडते न उडते तोच कर्नाटक भटके वाल्मिकी संघाच्या राज्य युवा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात अंडी घेऊन निदर्शने करून अंडी देण्याची मागणी केली. मागास विध्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या विध्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासोबत अंडी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गरम जेवणासोबत अंडी देण्याचा निर्णय योग्य आहे. तो कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये अशी मागणी निदर्शकांनी हातात अंडी धरून केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 
यासंदर्भात बोलताना वाल्मिकी संघाच्या युवा शाखेचे राज्याध्यक्ष महेश शिग्गीहळ्ळी म्हणाले, ज्या विध्यार्थ्यांना अंडी नको असतील त्यांना वेगळे शाकाहारी जेवण द्यावे. पण अंडी देण्याचा निर्णय रद्द करू नये. निर्णय रद्द केल्यास अधिवेशन काळात सर्व दलितपर संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी शिवा नायक, परशुराम हेनगी, आदर्श दनदमनी, कार्तिक, बाबू, सचिन आदी उपस्थित होते.


Recent Comments