Accident

जनरल बिपीन रावत यांचे लष्करी हेलिकॉप्टर क्रॅश

Share

तिन्ही भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांना घेऊन जाणारे लष्करी हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कन्नूर येथे जंगलात बुधवारी क्रॅश झाले आहे. रावत यांच्यासह एकूण 9 जण यातून  प्रवास करत होते. क्रॅश होताच हेलिकॉप्टरमध्ये आगीचा भडका उडाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लवकरच या घटनेबाबत राज्यसभेत निवेदन करणार आहेत.

जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही यात समावेश होता. त्यातील 4 जणांचे मृतदेह सापडले असून रावत यांचा अद्याप पत्ता नाही.

प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी डॉक्टर, लष्करी अधिकाऱ्यांसह कमांडो उपस्थित आहेत. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अतिशय वाइट होती. ते पूर्णपणे भाजले होते.

जनरल बिपीन रावत यांच्याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. जनरल बिपिन रावत 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते. यानंतर 1 जानेवारी 2020 मध्ये त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ हे पद देण्यात आले.

या हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लें. . हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार, ले. नायक विवेक कुमार, ले. नायक बी. साई तेजा, हवालदार सतपाल यांचा समावेश होता.

Tags: