Accident

चोर्ला घाटात भीषण अपघात: डंपर आणि कारच्या धडकेत बेळगावच्या युवकाचा मृत्यू

Share

चोर्ला घाटात झालेल्या भीषण रस्ते अपघातात बेळगावमधील वडगाव येथील रहिवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.

गोव्याहून येणाऱ्या कारला डंपरने धडक दिल्याने कारचा पार चुराडा झाला असून, पोलिस आणि बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला.

चोर्ला घाटातील डेल्टा रिसॉर्टजवळ गोव्याकडून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या कारला समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात आनंदनगर, वडगाव येथील रहिवासी श्याम उर्फ रावळनाथ तुळजाई (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेच्या तीव्रतेमुळे कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता आणि मृतदेह गाडीतच अडकून पडला होता. सुरुवातीला कारमध्ये इतरही प्रवासी असावेत असा संशय होता, मात्र बचाव कार्यानंतर ते एकटेच प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले.

अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिस आणि बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. कारचे मोठे नुकसान झाल्यामुळे घटनास्थळी कटर मागवून वाहनाचा काही भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह खानापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेप्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Tags: