बेळगावमध्ये आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना आगामी निवडणुकीत प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी डीकेशींना टोला लगावत डीकेशी कमकुवत असल्याची टीका केली आहे. शिवाय यासाठी त्यांना कोणत्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याचेही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

बेळगावचे आमदार, खासदार, मंत्री आणि नेत्यांच्या बैठकीसाठी आज ते बेळगावमध्ये आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, १३ डिसेंबर पासून बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि बसवराज होरट्टी यांनी बेळगावमध्ये अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात अधिवेशन घेण्यात आले नाही. परंतु यंदा कोरोना नियमावलीचे पालन करत अधिवेशन भरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यानंतर राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शेती, पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात विधानसभेत चर्चा होईल, अशी आशा आहे. कालपर्यंत शेतकऱ्यांना ४२० कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पर्यायी पिकांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. फळे आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले असून यासाठीही नुकसान भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील ग्रामपंचायतींचा अमृत योजनेत समावेश करण्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पुढील वर्षी सर्व पंचायतींना योजनेच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. बेघरांसाठी विशेष कार्यक्रम तयार केला जात असून ग्रामपंचायतींना अधिक ताकदवान करण्याचा प्रयत्न करत गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत जेडीएसच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आले असता जेडीएसला आपण पाठिंबा देण्यासंदर्भात विचारले नसून माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आवाहन केले असल्याचे सांगितले. पाठिंब्याच्या निर्णय हा जेडीएसवर सोडण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अधिवेशन आणि विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करताना काँग्रेस आणि डीकेशी यांच्यावरही टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी डीकेशी कमकुवत असल्याचे सांगत यासाठी कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही म्हटले आहे. विधान परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ग्रामपंचायतींच्या विकासासंदर्भात विधान करत प्रचाराची भूमिकाही पार पाडली आहे.


Recent Comments