आनंदवाडीतील त्या ४५ कुटुंबांनी वक्फ बोर्डाच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही येथील जागा खरेदी करून त्यावर घरे बांधली आहेत. त्यामुळे जागा परत देण्याचा प्रश्नच उदभवत नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

होय, २५ नोव्हेंबरला वक्फ बोर्डाने आनंदवाडीतील ४५ घरांची जागा आपली असल्याचा दावा करत घरे खाली करण्यासाठी टिळकवाडी पोलिसांना पाठवले होते. त्याला रहिवाशांनी जोरदार विरोध केला होता. त्यावेळी पोलीस आणि रहिवाशांमध्ये जोरदार वादविवाद झाला होता. त्यानंतर रहिवाशांनी आज, शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना शशिकांत रणदिवे म्हणाले, १९१८पासून आम्ही येथे रहात आहोत. कायदेशीररित्या घरफाळा, पाणीपट्टी, वीजबिल भरत आहोत. त्याचप्रमाणे आमच्या वाडवडिलांनी ही जागा खरेदी केल्याची सरकारी कागदपत्रेही आमच्याकडे आहेत. जागामालक शेरखानवाले किंवा अन्य कोणीही २०१४ पर्यंत आले नाहीत. २०१८ ला वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली होती. त्यांना आम्ही कायदेशीर प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला आ. अभय पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. त्यांनी आमची वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घालून दिली आहे. जोल्ले यांनी येत्या अधिवेशनात हा विषय मांडून आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबद्दल रणदिवे यांनी येथील रहिवाशांतर्फे उभय नेत्यांचे आभार मानले. 
या संदर्भात पवन धोंगडी म्हणाले, नाथ पै सर्कलपासून ते आर. के. राधाकृष्णन मार्ग, हिंदवाडी पर्यंत असलेल्या संपूर्ण आनंदवाडीची जागा आपलीच असल्याचा दावा वक्फ बोर्ड करत आहे. आम्ही ४५ कुटुंबे १५० वर्षांपासून अधिक काळ येथे रहात आहोत. आम्ही लीजवर रहात असल्याचे आणि ती लीज संपल्याचे वक्फ बोर्ड म्हणते. पण आमच्याकडे या जागांच्या खरेदीची कागदपत्रे आहेत. तुमच्याकडे लीजची कागदपत्रे असतील तर दाखवा म्हटल्यावर वक्फ बोर्डाकडे त्याचे उत्तर नाही. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या विरोधात आम्ही कायदेशीर लढा देणार आहोत असे सांगितले.
एकंदर बऱ्याच वर्षांनी आनंदवाडीचे रहिवाशी आणि वक्फ बोर्डातील जागेचा वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. त्यावर रहिवाशांनी कायदेशीर लढाईचा निर्धार केला आहे. न्यायालयीन लढाईत कोण बाजी मारते हे पाहण्यासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


Recent Comments