Belagavi

हिरेबागेवाडीजवळ महामार्ग रोखून शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

दिल्लीजवळील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि वादग्रस्त कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेळगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर जोरदार आंदोलन केले. महिला आंदोलकांचाही यात लक्षणीय सहभाग होता

वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. नुकतेच केंद्र सरकारने ३ वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. परंतु अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु ठेवण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगावात शुक्रवारी विविध शेतकरी संघटनांतर्फे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर आंदोलन करण्यात आले. हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ प्रारंभी महिला आंदोलकांनी जोरदार निदर्शने करून महामार्ग रोखला. महिला आंदोलक आयेशा सनदी यांनी चाबकाने स्वतःला मारून घेत आक्रोश व्यक्त केला. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग अडविणाऱ्या आंदोलकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.

याचवेळी भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिडगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले. यावेळी मोदगी यांनी कायदा न मोडण्याचे आवाहन आंदोलकांना केले. यावेळी बोलताना मोदगी म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले सर्व कायदे तातडीने मागे घ्यावेत. हिवाळी अधिवेशनाच्या आत सर्व वादग्रस्त कायदे मागे घ्यावेत. राज्य सरकारनेही याबाबत त्वरित निर्णय घेऊन वादग्रस्त भूसुधारण कायदा, गोहत्या बंदी कायदा मागे घ्यावेत. त्याचप्रमाणे ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा निर्णय रद्द करावा. आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीने सानुग्रह निदान द्यावे आदी मागण्या मोदगी यांनी केल्या.

यावेळी संयुक्त किसान मोर्चाच्या घटनेचे वाचन करून सरकारचा निषेध करण्यात आला. महामार्ग रोखून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंध केला. त्यामुळे पोलीस व आंदोलकांच्या शाब्दिक चकमक झडली. त्यानंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

 

Tags: