Belagavi

बेळगावमध्ये विजयोत्सव : शेतकरी आंदोलनाचा विजय

Share

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर देशभर विजयोत्सव साजरा करण्यात येत असून आज बेळगावमध्येदेखील मोठ्या उत्साहात काँग्रेस, जेडीएस आणि शेतकरी संघटनांनी विजयोत्सव साजरा केला.

शेतकऱ्यांना मारक ठरलेले तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेतले असून या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेस, जेडीएस आणि शेतकरी संघटनांच्या माध्यमातून आज बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात आकाशात फुगे सोडून, मिठाई वाटप करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य शंकर मूडलगी यांनी प्रतिक्रिया देताना केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घटले असून या कायद्याच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरु होते. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबाची पुढील जबाबदारी कोण घेणार? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

यानंतर काँग्रेस कार्यकर्त्या आयेशा सनदी या प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, भाजपने निवडणुकीतील पराजयाच्या भीतीने सदर कायदे मागे घेतले आहेत. त्यांना माणुसकी असती तर इतक्या निष्पाप शेतकऱ्यांचा जीव गेला नसता. हे कायदे यापूर्वीच मागे घेण्याची गरज होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

चन्नम्मा चौकात साजरा करण्यात आलेल्या या विजयोत्सवात काँग्रेस कार्यकर्ते, जेडीएस कार्यकर्ते, विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: