Belagavi

शेतकऱ्यांच्या दबावापुढे झुकून कृषी सुधारणा कायदे मागे : सतीश जारकीहोळी यांची टीका

Share

 वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल भाजपला शाबासकी देता येणार नाही. लोकांच्या, शेतकऱ्यांच्या दबावापुढे झुकून हे कायदे मागे घेतले आहेत अशी सणसणीत टीका केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी केली.

बेळगावात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. आ. जारकीहोळी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेणे ही मोठी आश्चर्यकारक घटना आहे. लोकांच्या, शेतकऱ्यांच्या लढयापुढे अखेर मोदींना मान झुकवावी लागली. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशसह देशभरातील शेतकऱ्यांनी सुमारे वर्षभर ऊन-वारा, पावसाची तमा न करता दीर्घ लढा दिला. त्याचे हे फलित आहे. त्यामुळे हा लोकांचा, शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे असे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या चौकटीत राहून काँग्रेससुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने लढला आहे. अनेक बुद्धिजीवींनी देखील कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन केले आहे असे त्यांनी सांगितले. पाच राज्यातील निवडणुकांमुळे घाबरून जात कृषी सुधारणा कायदे मागे घेतले का? या प्रश्नावर आ. जारकीहोळी म्हणाले, एकतर्फी निर्णय घेतल्याने काय होते याची भीती भाजपला सतावत आहे. आमच्या देशात शेतकरी मोठ्या संख्येने असल्यानेच त्यांच्या आंदोलनाला भिउनच हे कायदे मागे घेतले आहेत असा वर त्यांनी भाजपशासित केंद्र सरकारवर केला.

एकंदर, शेतकऱ्यांना मारक ठरणारे हे कायदे जर आधीच मागे घेतले असते तर भाजपला मान मिळाला असता अशी टीका आ. सतीश जारकीहोळी यांनी या निमित्ताने केली.

 

 

 

Tags: