Belagavi

हलगा-मच्छे बायपासचा वाद पेटला ! शेतकऱ्यांचा, महिलांचाही प्रखर विरोध : पोलीस बळाचा वापर करून काम सुरु

Share

 प्रस्तावित हलगामच्छे बायपासला प्रखर विरोध करत शेतकऱ्यांनी आज मच्छे येथे तीव्र निदर्शने केली. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधाला जुमानता पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन रस्ता काम सुरु करण्याचा प्रयत्न झाल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची चिन्हे ठळक झाली आहेत.

होय, सुमारे ९.५ किमीचा हलगा-मच्छे बायपास निर्माण करण्यासाठी सरकारने १३४ एकर जमीन संपादित केली आहे. मात्र त्यातील अनेक शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला आहे. मात्र त्याला न जुमानता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बायपास करण्यास पुढे सरसावले आहे. त्याला बुधवारी शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र आज पुन्हा कामाला सुरवात केल्याची माहिती मिळताच महिलांसह शेतकरी मोठ्या संख्येने याठिकाणी जमा झाले. कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही असे सांगत त्यांनी कार्यस्थळीच ठाण मांडून निदर्शने सुरु केली. यावेळी दाखल झालेल्या पोलिसांनी मोठी कसरत करत निदर्शक शेतकऱ्यांना ताब्यात घेत वाहनातून घेऊन गेले. यावेळी शेतकऱ्यांनी, ‘हवे तर आम्हाला गोळ्या घाला परंतु आम्ही आमची जमीन देणार नाही’ असे सांगत पोलिसांशी वाद घातला. यावेळी महिला निदर्शकांना आवरताना एका निदर्शक महिलेची साडी फाटली. हातात विळे घेऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यावेळी त्यांच्या हातातून विळे काढून घेताना पोलिसांच्या नाकी नऊ आले. यावेळी घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

यावेळी निदर्शकांनी पोलिसांनी आपल्यावर बळाचा वापर केल्याचा आरोप केला. बायपाससाठी आधी निश्चित केलेली जमीन न घेता, आमची सुपीक जमीन घेण्यात येत आहे. आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न त्यांनी केला.

यावेळी आपल्या जमिनीतून बायपास करायचा प्रयत्न केल्यास झाडावरून उडी टाकून आत्महत्या करण्याची धमकी देत अमित अनगोळकर या शेतकऱ्याने झाडावर चढून निदर्शने सुरु केली. पोलिसांनी माझ्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. आमची ३ एकर सुपीक जमीन आहे. कोणत्याही परिस्थितीत बायपाससाठी जमीन देणार नाही. जमीन बळजबरीने घेतली तर झाडावरून उडी टाकून आत्महत्या करू असा इशारा त्याने दिला. बाईट

आपली सुपीक जमीन हातची जाणार या भीतीने आकाश अनगोळकर या शेतकऱ्याने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी त्याचे पेटलेले कपडे विझवले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपचारांसाठी जिल्हा इस्पितळात पाठवून दिले. यावेळी निदर्शक शेतकऱ्यांना पोलीस ताब्यात घेत असताना जोरदार विरोध करण्यात आला.

यावेळी बोलताना निदर्शक महिला शेतकरी सुमित्रा अनगोळकर म्हणाल्या, या जमिनीबाबत न्यायालयात खटला सुरु आहे. आम्ही सरकारकडून एक पैही घेतलेली नाही. तरीही आमच्या जमिनीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही आमच्या मुलाबाळांसह गंजी पिऊन जगायची वेळ आली आहे. गेल्यावर्षीही आमचे घाम गाळून पिकवलेले लाखो रुपयांचे हातातोंडाशी आलेले ऊसपीक यांनी नष्ट केले. आता ते येऊ तर देत, दगडाने ठेचून काढते असा इशारा देत हातात दगड घेऊन ही निदर्शक महिला शेतकरी उभी राहिली.

या संदर्भात बोलताना अमित या शेतकऱ्याने सांगितले की, बायपाससाठी आधी झिरो पॉईंट फिक्स करा असा न्यायालयाचा आदेश आहे. पण ते केलेले नाही. सरकारनेही भरपाई देऊन आमची जमीन प्राधिकरणाला देतो असे म्हटलेले नाही. उलट आमच्यावर दबाव टाकून सुपीक जमीन ताब्यात घेण्यात येत आहे. बायपाससाठी ठरवलेली जागा वेगळी अन प्रत्यक्षात काम सुरु असलेली जागा वेगळी. आधी निश्चित केलेल्या जागेत काही राजकारण्यांची जमीन जात असल्यानेच आधीची जागा बदलण्यात आली आहे असा आरोप त्याने केला. 

याच दरम्यान पोलीस संरक्षणात जेसीबीने बायपासचे काम सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले. एका निदर्शक महिलेने कामाच्या ठिकाणी ठाण मांडले. तिला उचलून पोलिसांनी बाजूला केले. तेवढ्यात एका शेतकऱ्याने जेसीबीच्या फावड्यावरच झोपून कामाला विरोध केला. त्यालाही पोलिसांनी उचलून बाजूला नेले.

यावेळी आपल्या ८ महिन्यांच्या बाळासह निदर्शने करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी जबरदस्तीने हाकलून लावले. पोलिसांच्या या दडपशाहीने त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले. या दरम्यान निदर्शकांनी पोलिसांविरोधात आक्रोश व्यक्त केला. सरकारच्या नावाने बोटे मोडली. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

 

 

 

Tags: