समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहांमध्ये सरकारने ठरवून दिलेल्या मेन्यूप्रमाणे भोजन आणि पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची कडक सूचना ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याचे मुख्य सचिव आणि बेळगाव जिल्ह्याचे पालक सचिव एल. के. अतिक यांनी अधिकाऱ्यांना दिली.

बेळगावात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अतिक म्हणाले, सरकारच्या आदेशान्वये आता अंगणवाड्या, शाळा-महाविद्यालये पूर्ण क्षमतेने भरवण्यात येत आहेत. तेथे कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. समाज कल्याण, अल्पसंख्यांक आणि मागासवर्ग विकास, अनुसूचित जाती-जमाती कल्याण खाते यांच्यातर्फे चालविण्यात येत असलेल्या विध्यार्थी वसतिगृहांत सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणात नाश्ता व जेवण पुरवावे. त्याशिवाय पिण्याचे शुद्ध पाणीही पुरवावे. विध्यार्थ्यांना अंथरूण-पांघरूणाची योग्य व्यवस्था करावी.
चांगल्या शौचालयांची सोय उपलब्ध करावी, शक्य आहे तेथे सौर ऊर्जेचा वापर करावा असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिले. येत्या काही दिवसांत सरकारी वसतिगृहांना अचानक भेटी देऊन तेथील आहाराची गुणवत्ता आणि सोयी-सुविधांची तपासणी केली जाईल. जिल्हाधिकारी आणि जिपं सीईओंच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी जिपं उपसचिवांच्या नेतृत्वाखाली सरकारी वसतिगृहांना अचानक भेटी देऊन आढावा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. गाव किंवा शहरापासून दूर ठिकाणी वसतिगृहे उभारू नयेत. शक्य तेवढ्या जवळ, विध्यार्थ्यांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणी त्यासाठी जागा मंजूर करावी, या वर्षीच्या शिष्यवृत्तीचे वितरण लवकर करण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. बैठकीत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, जिपं सीईओ दर्शन एच. व्ही., बेळगाव प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगांनावर, बैलहोंगलचे शशिधर बगली, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक, जिल्हास्तरीय अधिकारी शिवनगौडा पाटील, डॉ. बाळकृष्ण तुक्कार, बसवराज वरवट्टी, उमा सालीगौडर, ईश्वर उल्लागड्डी, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे आदी अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments