प्रकाशाचा उत्सव असलेल्या ऐन दिवाळी सणातच कोवळ्या, अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना बेळगावजवळील कंग्राळी बी. के. गावात घडली आहे. या घटनेने ग्रामस्थांची झोप उडाली असून, पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरु केला आहे.

बेळगावात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचे आगमन झाले आहे का अशी शंका येण्यासारखी घटना नुकतीच बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी. के. गावात घडली. या घटनेने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. कंग्राळी बी. के. गावापासून बेळगावला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर आपल्या घरांसमोर खेळणाऱ्या अनुक्रमे ४ आणि ६ वर्षे वयाच्या दोन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न झाला आहे. मारुती ओम्नी वाहनातून आलेल्या ४ अपहरणकर्त्यांनी चॉकलेटचे आमिष दाखवून या मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. चॉकलेटच्या आमिषाला या मुली बळी पडल्या नसल्याने किडनॅपर्सनी त्यांना पकडून पळवून न्यायचा प्रयत्न केला. याचवेळी शेजारच्या घरातील एक महिला तेथे अली. तिने संशयावरून हटकल्यावर किडनॅपर्सनी तेथून गाडीसह बेळगावच्या दिशेने पळ काढला.
दरम्यन, या घटनेने कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण पसरले असून, मुलांना खेळायला घराबाहेर सोडण्यास गावकरी धजेनासे झाले आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्याने बेळगाव ग्रामीण भागात किडनॅपर्स मुन्हा सक्रिय झाले आहेत का अशी शंका घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य यल्लोजी पाटील यांनी केली.
गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर एपीएमसी पोलिसांनी गावात भेट देऊन त्या २ लहान मुली आणि स्थानिकांकडून माहिती घेतली. अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी जाळे विणले आहे. दरम्यान, मुलींचे अपहरण टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.


Recent Comments