कौटुंबिक वादातून एकाने आपल्या सावत्र बापाचा निर्घृण खून केल्याची घटना खानापूर तालुक्यातील बेडरहट्टी गावात घडली.

होय, किरकोळ कारणावरून कारणावरून मुलगा हिंस्त्र झाला आणि त्याने कुऱ्हाडीचे घाव घालून सावत्र बापाचा काटा काढला. बेदरहट्टी गावातील या घटनेने खानापूर तालुका हादरला आहे. ५१ वर्षीय करेप्पा पुन्नाप्पा पुजेरी असे मृत सावत्र पित्याचे नाव आहे. ऊस तोडणीसह मिळेल ते मोलमजुरीचे काम करून तो पोट भरत होता. त्याच्या पत्नीला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा यल्लाप्पा कोडेन्नावर हा देखील करेप्पा याच्या शेजारीच रहात होता. त्याचे लग्न झाल्याने करेप्पानेच त्याला रहायला आपल्या घराशेजारीच त्याला शेड बांधून दिले होते. तसे पाहता सगळेजण मिळूनमिसळून रहात. पण बुधवारी नक्की काय झाले देव जाणे, दारू पिऊन आलेला यल्लाप्पा पत्नीसोबत भांडण करत होता. त्यावेळी शेतातून काम करून आलेला करेप्पा छातीत दुखत होते म्हणून आपल्या घरी झोपला होता. सावत्र मुलाचे व सुनेचे भांडण ऐकून तो हे भांडण सोडवायला गेला. त्यावेळी अचानक यल्लाप्पाने करेप्पा याच्यावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा निर्घृण खून केला. त्यामुळे जोरदार रक्तस्त्राव होऊन करेप्पा तडफडून जागीच मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 
घटनेची माहिती मिळताच नंदगडचे सीपीआय सतीश माळगोंड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. उत्तरीय तपासणीसाठी करेप्पाचा मृतदेह बेळगाव जिल्हा इस्पितळाला पाठवून दिला. यावेळी खुनासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना करेप्पाचा मुलगा नागप्पा याने सांगितले की, छातीत दुखत असल्याने माझे वडील करेप्पा १२च्या सुमारास शेतातून घरी येऊन झोपले होते. दुपारी ३ च्या सुमारास दारू पिऊन आलेला भाऊ यल्लाप्पा पत्नीशी भांडण करत होता. त्यावेळी वडील करेप्पा भांडण सोडवायला गेले असता, भावाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. याआधी कसलेच भांडण झाले नव्हते. सगळेजण मिळूनमिसळून रहात होतो. आमच्या घराशेजारीच वडिलांनी भाऊ यल्लाप्पाला शेड बांधून दिले होते असे नागप्पाने सांगितले.
करेप्पाच्या बहिणीने सांगितले की, छातीती दुखतंय, घरी जाऊन विश्रांती घेतो असे करेप्पाने सांगितल्यावर शेतातच झोपण्याचा सल्ला आम्ही दिला. पण त्याने घरी जातो असे सांगितले. त्यावर ठीक आहे, विश्रांती घे, उद्या दवाखान्याला जाऊन उपचार घे असे आम्ही सांगितले. त्यानंतर तो घरी गेल्यावर असा प्रकार घडला.
एकूण काय तर, स्वतःच्या पोट जन्मला नाही, पत्नीला पहिल्या पतीपासून झालेला सावत्र मुलगा असूनही करेप्पाने यल्लाप्पाला पिता नसलेला पोरका मुलगा म्हणून जवळ केले, त्याला आपले मानले. परंतु अखेर त्याच सावत्र मुलाने करेप्पाचा घात केला हे दुर्दैव. याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी यल्लाप्पाला अटक करून तपास चालविला आहे.


Recent Comments