गरीब आणि वंचितांना प्रगतीची संधी उपलब्ध करून देणं हे सहकार चळवळीचे वैशिष्ट्य आहे असे विचार विधान परिषदेतील सरकारचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केले.

बेळगावातील नेहरुनगरात शनिवारी राज्य सौहार्द सहकारी बेळगाव विभागाने आयोजित केलेल्या बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती, गोकाक, मुडलगी, चन्नम्मा कित्तूर आणि यरगट्टी तालुक्यातील सौहार्द सहकारी संस्थांच्या संपर्क मेळाव्याचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते. कवटगीमठ पुढे म्हणाले, २१व्या शतकात उभे थकलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे सामर्थ्य सहकार चळवळीत आहे. हे सामर्थ्य आणखी वाढवण्याचे काम आम्ही केले पाहिजे. राष्ट्रीय व खासगी बँक, वित्तसंस्थांचा मुकाबला करून सहकाराची पाळेमुळे आणखी घट्ट करण्यासाठी सहकारी संस्थांनी अनावश्यक खर्चावर पायबंद घातला पाहिजे. आधुनिक जगतातील बाजारपेठेतील, वित्तक्षेत्रातील बदलानुसार सहकारी संस्थांनीही स्वतःत आमूलाग्र बदल घडवून आणत स्पर्धेत टिकून रहायला हवे असा कानमंत्र त्यांनी दिला. 
चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, आगामी काळात सहकार क्षेत्रात अनेक बदल होऊ घातले आहेत. पारदर्शी व्यवहार ठेवणाऱ्या परिश्रमी सहकारी संस्थांना आणखी चांगले दिवस येतील. त्यामुळे सहकारी संस्थांनी आतापासूनच पारदर्शी व प्रामाणिक व्यवहार ठेवून गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या उत्थानासाठी झटले पाहिजे. आर्थिक सामर्थ्य, प्राधान्यक्षेत्र आणि समयसूचकता याना महत्व दिल्यास सहकारी संस्था बळकट होतील असे खा. जोल्ले यांनी सांगितले.
राज्य सौहार्द संयुक्त सहकारीचे अध्यक्ष एच. बी. कृष्णारेड्डी यांनी यावेळी सहकार क्षेत्राच्या मजबुतीबाबत मार्गदर्शन केले. फ्लो
यावेळी उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ, संचालक लक्ष्मण पवार व्यासपीठावर उपस्थित होते. सरव्यवस्थापक बसवराज होंगल यांनी स्वागत केले. अश्विनी कम्मार यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा मठ यांनी आभार मानले.


Recent Comments