Belagavi

बेनकनहळ्ळीत ऑनर किलिंग? मुलीकडच्यांनी केली युवकाची हत्या?

Share

बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळीतील मारुती गल्ली येथील रहिवासी संजय भरमा पाटील (29)  याचा हिरोजी मळा येथे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मृत संजयचे गावातील एका मुलीवर प्रेम होते. मात्र मुलीच्या घरच्यांना हे प्रेम प्रकरण मान्य नव्हते. त्यातूनच ही घटना घडल्याची गावामध्ये सद्या चर्चा होत आहे. संजयचा फास लावून खून केल्याचा आरोप मृत कुटुंबियांकडून केला जात आहे .

या संदर्भात माहिती देताना संजयच्या काकूने सांगितले की, काल शुक्रवारी रात्री 9. 30 वाजता बाळू परशराम देसुरकर, अंजना बाळू देसुरकर, जोतिबा परशराम देसुरकर, वसंत देसुरकर, वंदना बाळू देसुरकर, कृष्णा देसुरकर, किरण वसंत पाटील, किसन बाळू देसुरकर, कौशिक कुडचीकर, मनोज बाळू देसुरकर यांनी संजयच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली. त्यानंतर संजय रात्रभर कुठे होता हे घरच्यांना माहीत झाले नाही. सकाळी हिंदू नगर येथे फिरायला गेलेल्याना संजयचा मृतदेह झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

संजयला आई नाही. त्यामुळे तो आणि वडील दोघेच रहात होते. त्याचे वडील आणि चुलत भावाने सांगितले की, संजयच्या प्रेमप्रकरणासंदर्भात चर्चेसाठी आज पंचांची बैठक होणार होती. त्यात याबाबत चर्चा करू, मारहाण करू नका असे आम्ही सांगितले. मात्र हल्लेखोरांनी ऐकले नाही असे सांगितले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण विभागाचे एसीपी गणपती गुडाजी, बेळगाव ग्रामीणचे सीपीआय सुनिलकुमार नंदेश्वर, कॅम्पचे  सीपीआय प्रभाकर धर्मट्टी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या धक्कादायक घटनेने बेनकनहळ्ळी गावात खळबळ माजली आहे. पोलीस तपासातच सगळे सत्य बाहेर येणार आहे. या घटनेची कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Tags: