बेळगाव पोलीस दलातर्फे गुरुवारी पोलीस हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. सतत तणावाखाली राहूनही पोलीस कर्तव्यनिष्ठेने करत असलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे उद्गार मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांनी यावेळी काढले.

बेळगाव जिल्हा पोलीस, शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गुरुवारी बेळगावातील पोलीस परेड मैदानावर आज पोलीस हुतात्मा दिन गांभीर्याने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी, आयजीपी सतीशकुमार, शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, सीएसपी, एसीपी तसेच नागरिकांनी पोलीस हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.
त्यानंतर गेल्या वर्षभरात हौतात्म्य पत्करलेल्या देशातील पोलिसांची यादी वाचून दाखवत एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी पोलीस हुतात्म्यांचे स्मरण केले.
त्यानंतर हवेत बंदुकीच्या ३ फैऱ्या झाडून हुतात्मा पोलिसांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस ध्वज अर्ध्यावर उतरवून २ मिनिटे मौन पाळून हुतात्मा पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर बोलताना प्रमुख पाहुणे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी म्हणाले, देशांच्या सीमांचे रक्षण करणे आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवणे दोन्ही महत्वाचे आहे. आज अनेक देशांत लोकशाही व्यवस्था मोडकळीस आली आहे. परंतु आमच्या खंडप्राय देशात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. याचे कारण म्हणजे आमच्या देशातील सशस्त्र सुरक्षा दले, ती डोळ्यात तेल घालून अंतर्गतसुरक्षा व्यवस्था राखण्याचे काम करत आहेत. गेल्या ७५ वर्षांपासून आम्ही देशाच्या घटनेशी बद्ध राहून काम करत आहोत. जोपर्यंत आम्ही घटना, कायद्याशी बद्ध राहून वागू तोपर्यंत आमची आंतरिक सुरक्षा, लोकशाही टिकून राहील असे न्या. जोशी यांनी सांगितले. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.


Recent Comments