Banglore

हुबळीतील बिबट्याचा विधानसभेतही धुमाकूळ !

Share

हुबळीतील नृपतुंग बेट्ट परिसरात आढळून आलेल्या बिबट्याने आज विधानसभेतही चर्चेच्या रूपाने गोंधळ घातला. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, काँग्रेसचे . प्रसाद ओब्बय्या यांनी या बिबट्याला त्वरित पकडण्याची मागणी केली

विधिमंडळ अधिवेशनात बुधवारी विधानसभेत बिबट्याचा मुद्दा गाजला. माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ आ. जगदीश शेट्टर म्हणाले, गेल्या ४-५ दिवसांपासून नृपतुंग बेट्ट परिसरात बिबट्याच्या वावराच्या मुद्यावरून हुबळीत भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात मी वनमंत्री उमेश कत्ती यांच्याशीही बोललो आहे. मात्र आजवर बिबट्याला पकडणे शक्य झालेले नाही. लवकरात लवकर बिबट्याला पकडून जंगलात सोडणे आवश्यक आहे.

याच मुद्द्यावर काँग्रेसचे आ. प्रसाद ओब्बय्या म्हणाले, १५ सप्टेंबरला रात्री ९च्या सुमारास बिबट्या दूशीं आल्याची माहिती प्रदीप शेट्टर नामक एका व्यक्तीने एका वृत्तपत्राला दिली आहे. नृपतुंग बेट्ट परिसरात खालच्या बाजूलाच माझेही घर आहे. त्याच्या सभोवती बिबट्याचा वावर असल्याच्या खुणा आढळल्या आहेत. भिंतीवरही बिबट्याचे पावलांचे ठसे आढळून आले आहेत. व्हिडिओतही बिबट्याच्या हालचाली स्पष्ट दिसून आल्या आहेत. बिबट्याने तेथील कुत्री आणि डुकरांचा फडशा पडला आहे. अजूनतरी बिबट्याने माणसावर हल्ला केलेला नाही. पण त्याच्याकडून कधी जिवहानी होईल हे सांगता येत नाही. येथून जवळच शिर्डी कॉलनी हि घनदाट लोकवस्ती आहे. ८ दिवस उलटले तरी अजून बिबट्याला का पकडले नाही असा सवाल आ. प्रसाद ओब्बय्या यांनी केला.

याच वेळी भाजप आ. रेणुकाचार्य उठून उभे राहिले आणि, माझ्या मतदारसंघातही बिबट्या दिसून आल्याचे सांगितले. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ आ. रमेशकुमार यांनी, रेणुकाचार्य असतील तेथे बिबट्या राहणे शक्यच नाही असे सांगत हास्याचा फटाका फोडला.

या चर्चेवर सरकारतर्फे उत्तर देताना जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांनी, बिबट्या दिसलेल्या परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आली आहे. आमदारांचे घरही तेथेच आहे. लवकरच तज्ज्ञांकडून निश्चितच बिबट्याला पकडण्यात येईल. त्यामुळे कोणी घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले. त्यावेळी हस्तक्षेप करत विरोधी पक्षनेते सिद्रामय्या यांनी, बिबट्या पकडण्यासाठी कोणत्या तज्ज्ञाची आवश्यकता नाही. वन कर्मचारी त्याला पकडतील, अगदी तुम्हीसुद्धा पकडू शकाल असा चिमटा काढला.

त्यानंतर बोलताना जगदीश शेट्टर यांनी कोणतीही प्राणहानी होण्यापूर्वीच बिबट्याला पकडण्याची मागणी केली. त्यावर मंत्री कारजोळ यांनी सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून, बिबट्याला लवकरच पकडण्यात येईल असे सांगितले.

एकंदर हुबळीकरांच्या मनात दहशत निर्माण केलेल्या बिबट्याने विधानसभेतही चर्चेच्या रूपातून धुमाकूळ घातला. त्याला लवकरात लवकर पकडावे हीच सगळ्यांची इच्छा आहे.

 

Tags: