आम्ही कसत असलेली सरकारी जमीन आमच्या नावे करा अशी मागणी करत खानापूर तालुक्यातील विविध गावच्या गावकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

खानापूर तालुक्यातील देवाचीहट्टी, आमटे, तोराळी, हब्बनहट्टी, गोल्याळी आदी गावच्या ग्रामस्थांनी आमटे गावातील सर्व्हे नं. ६३, ६४, ६५, ६६, ६७, ६८, ९० आणि १२१ मधील जमीन सुमारे ६० वर्षांपासून स्थानिक शेतकरी कसत आहेत. मात्र ४ वर्षांपूर्वी यातील ४०८ एकर जमीन सरकारने सीआरपीएफला दिली आहे. उरलेली जमीन आता सरकार इतर शेतकऱ्यांना देण्यास पुढे आले आहे. हे चुकीचे असून आम्ही कसत असलेली जमीन आमच्या नावेच नोंद करा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यासंदर्भात ‘आपली मराठी’सोबत बोलताना ग्रामस्थ मारुती पाटील यांनी सांगितले की, गेल्या ५०-६० वर्षांपासून गावकरी सरकारी जमीन कसत आले आहेत. त्यातील ४०८ एकर जमीन सरकारने आधीच सीआरपीएफला दिली आहे. त्यात उरलेली २०० एकर जमीन इतरांना देण्यास सरकार पुढे आले आहे हे चुकीचे आहे. जे शेतकरी जमीन कसत आले आहेत, त्यांच्याच नावे ही जमीन करावी अशी मागणी पाटील यांनी केली. धनश्री सरदेसाई यांनीही जे शेतकरी ५०-६० वर्षांपासून जमीन कसत आले आहेत, त्यांच्याच नावे ही जमीन करावी अशी मागणी केली. कष्टकरी शेतकऱ्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये असे त्यांनी सांगितले.
यावेळी देवाचीहट्टी, आमटे, तोराळी, हब्बनहट्टी, गोल्याळी आदी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments