Belagavi

बेळगाव गणेशोत्सवाची पूर्वतयारी बैठक; डीजेवर बंदी, मूर्तींची उंची १२ फुटांपर्यंत मर्यादित, १० लाखांपर्यंतचा वीजखर्च जिल्हा प्रशासन उचलणार

Share

बेळगाव गणेशोत्सवासाठीची सर्व तयारी सुरू झाली असून, यंदाही सार्वजनिक मंडळांचा वीजबिल खर्च जिल्हा प्रशासनच उचलणार असल्याची मोठी घोषणा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. कोणत्याही भेदभावाशिवाय संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल अशा पद्धतीने अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात सण साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बेळगाव येथील कुमार गंधर्व कला मंदिरात बेळगाव जिल्हा प्रशासन आणि गणेशोत्सव महामंडळांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने सागर पाटील आणि लोकमान्य श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेकडे दोन प्रमुख मागण्या मांडल्या. कपिलेश्वर तलावातील जुनी विसर्जन टाकी विस्तारित करणे आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ नवीन कृत्रिम विसर्जन टाकी निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली. शहराच्या शहापूरसह विविध भागांत एल अँड टी व गॅस पाईपलाईनच्या कामामुळे पडलेले खड्डे तातडीने बुजवून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्ग सुरळीत करावा, अशी विनंती त्यांनी केली.

बेळगावात सौहार्दपूर्ण आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सरचिटणीस विकास कलघटगी आणि शहापूर श्री गणेशोत्सव महामंडळाचे प्रमुख नेताजीराव जाधव यांनी महानगरपालिका व पोलीस आयुक्तांकडे केली. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, मंडप व विसर्जन मार्गावर स्वच्छता राखणे, शौचालयांची सोय करणे, धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे आणि उंच मूर्तींच्या वाहतुकीसाठी हेस्कॉमच्या विद्युत तारांची उंची वाढवण्याची मागणी त्यांनी केली. हेस्कॉमच्या सातत्यपूर्ण सहकार्याचे कौतुक करत सर्व सरकारी विभागांनी समन्वयाने काम करून उत्सव यशस्वी करावा, असे त्यांनी सांगितले.

उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून मिरवणूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली असल्याचे सांगितले. शहरातील विविध विसर्जन तलावांची स्वच्छता, पथदिव्यांची देखभाल आणि झाडांच्या फांद्या छाटण्यावर तात्काळ पावले उचलावीत, असे सांगत ही सर्व कामे महानगरपालिकेकडून केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, गेल्या वेळी गणेशोत्सवा दरम्यान हेस्कॉमच्या बिलात सवलत देण्यात आली होती. या वेळीही वीजखर्च (१० लाख रुपयांपर्यंत) जिल्हा प्रशासन व महानगरपालिका उचलणार आहे. त्यामुळे कोणीही विजेचा गैरवापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका आणि महामंडळे यांनी एकजुटीने काम करून बारीक-सारिक त्रुटी दूर कराव्यात; ‘आमचा-तुमचा सण’ असा भेदभाव न ठेवता बंधुभावाने संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल अशा भव्यदिव्य पद्धतीने सण यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य त्यांनी मागितले.

शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या वेळीही डीजे वापरण्यास परवानगी नसून सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची १२ फुटांपर्यंतच मर्यादित असेल, असे स्पष्ट केले. तसेच विसर्जन सुलभ व्हावे यासाठी मूर्तींना ‘हुक’ बसवणे अनिवार्य असल्याचे सांगितले. शहरातील १४ लाख नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे. प्रत्येक मंडळात एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाईल आणि मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करून चोऱ्या रोखण्यासाठी पावले उचलली जातील. याशिवाय अश्लील गाण्यांवर बंदी आणि रात्री १० वाजेनंतर ध्वनिवर्धक न वापरण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कडक निर्देश त्यांनी मंडळांना दिले.

या प्रसंगी महापौर प्रीती कामकर, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम., गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: