अखेर राज्य सरकारने आजपासून पुन्हा एकदा शाळा-महाविद्यालयांना प्रारंभ केला असून याच पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील एका सरकारी शाळेत वन आणि अन्न मंत्री उमेश कत्ती यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेला प्रारंभ झाला.

: कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या २ वर्षांपासून बंद असलेल्या शाळा – महाविद्यालयांना राज्यभरात आज पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे वन आणि अन्न मंत्री उमेश कत्ती यांनी हुक्केरी तालुक्यातील गुडस सरकारी शाळेला भेट दिली. यावेळी सरस्वतीप्रतिमा पूजनाने शाळेच्या कामकाजाला प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी उमेश कत्ती यांच्या हस्ते दूध पावडर आणि पौष्टिक आहाराच्या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी उमेश कत्ती यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. ते म्हणाले कि, दररोज विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहिले पाहिजे. शाळेला येताना घरातून पाणी आणि आहार घेऊन यावा. याशिवाय सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्यावे. याशिवाय भीती न बाळगता धैर्याने आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले अक्षर दासोहचे संचालक शैलेश हिरेमठ, विशेषाधिकारी राजशेखर पाटील, गुडस सरकारी शाळेचे मुख्याध्यापक बी. पी. कडबीन, पीकेपीएस अध्यक्ष मल्लू नरसन्नवर, मागासवर्गीय अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अधिकारी गौरीशंकर कड़ीचूर आदी उपस्थित होते.
याचप्रमाणे हुक्केरी शहरातील श्री गुरूशांतेश्वर कन्नड शाळेतदेखील हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामी गुरूशांतेश्वर यांच्या प्रतिमा पूजनाने शालेय कामकाजाला सुरुवात करण्यात आली. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा लागला. यादरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी याचा विचार करून आजपासून शाळांना सुरुवात केली आहे. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे ते म्हणाले.


Recent Comments