हुक्केरी तालुक्यातील मदमक्कळनाळ या गावातील लष्करी जवान , मंजुनाथ पाटील हे सेवानिवृत्त होऊन गावी परतल्याने , त्यांचे गावकऱ्यांनी शानदार स्वागत केले .हुक्केरी तालुक्यातील मदमक्कळनाळ गावातील मंजुनाथ पाटील हे गेल्या १७ वर्षांपासून देशसेवा बजावत होते . आता ते सेवानिवृत्त होऊन , आपल्या गावी परतले आहेत . गावातील लोक , आणि बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने , वाजतगाजत त्याची गावात मिरवणूक काढली . यावेळी सुवासिनींनी त्यांना ओवाळले .
यानंतर हुबळीच्या नीलकंठेश्वर मठाचे शिवशंकर महास्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात , कागवाडचे वेदमूर्ती यतीश्वरानंद महास्वामींच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात , कुरुविनशेट्टी समाज बांधव तसेच गावकऱ्यांनी , मंजुनाथ पाटील यांचा सत्कार केला .त्याचप्रमाणे , बेळगाव जिल्हा माजी सैनिक हितरक्षण संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ . महादेव बनक्कगोल, विद्यमान अध्यक्ष रायप्पा बनक्कगोल, पुंडलिक कोटिनवर , शशिकांत मानस , कल्लापा हेब्बाळ , अमर वाली, निरंजन कुरबेट , शिवू पाटील आणि इतरानी , बैलहोंगल येथील निवृत्त जवान , वीरभद्र कुंभार यांचा सत्कार करुन अभिनंदन केले . व्यासपीठावर गावातील जेष्ठ बसवानी बेळवी , शिवगौडा पाटील , चन्नबसय्या हिरेमठ , के एस पाटील उपस्थित होते .

यानंतर माध्यमांशी बोलताना स्वामीजी म्हणाले कि , देश सेवा करणारे जवान आणि अन्नदाता शेतकरी यांचा सन्मान करण्यात प्रत्येकाचे कर्तव्य आहे . आज मदमक्कळनाळ गावातील योद्धा देशसेवा बजावून , निवृत्त होऊन गावी परतल्याने त्यांचे शानदार स्वागत करण्यात आले आहे . माजी सैनिक संघाचे हुक्केरीचे तालुका अध्यक्ष म्हणाले कि , मदमक्कळनाळ गावातील जनतेने आज दोघा निवृत्त सैनिकांचा सत्कार केला आहे . शेतकरी आणि सैनिकांना आदराने पाहिले पाहिजे .
निवृत्त सैनिक मंजुनाथ पाटील यांनी सांगितले कि मी १७ वर्षे देशसेवा केली. आज मी माझ्या जन्मगावी परत आलो आहे . माझे पुढील जीवन मी समाजसेवेसाठी वाहणार आहे . माझे शानदार स्वागत आणि अभिनंदन केलेल्या माझ्या गावकऱ्यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो . यावेळी , मदमक्कळनाळ, बेनिवाड , शिरगाव , सुल्तानपूरचे ग्रामस्थ , तसेच माजी सैनिक हितरक्षण संघाचे पदाधिकारी तसेच मंजुनाथ पाटील यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते .


Recent Comments