Belagavi

१८ तास झोपून विकास कसा होणार? लक्ष्मण सवदी यांचा सवाल

Share

उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी जनतेने इच्छाशक्ती दाखवून हक्कांसाठी संघर्ष करण्याची गरज आहे. १८ तास झोपून विकास कसा होणार, असा सवाल करत मंत्री लक्ष्मण सवदी यांनी अप्रत्यक्षपणे भालचंद्र जारकीहोळी यांना प्रत्युत्तर दिले.

उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत बोलताना सवदी म्हणाले की, एका भागाचा विकास होतो आणि दुसऱ्या भागाचा होत नाही, यामागे राजकीय अपयशही आहे. आपल्या भागाच्या हक्कांसाठी जनतेने पुढाकार घेऊन संघर्ष करावा. जेवण करून १८ तास झोपून राहिल्यास किंवा बेंगळुरूला पोहोचेपर्यंतच काम उरकत असल्यास विकास साध्य होणार नाही. त्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेण्याची आणि जागरूक राहण्याची तयारी हवी, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये सध्या २१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. म्हैसूर-चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर-कोलार, उडुपी-मंगळूर आणि रायचूर-कोप्पळ या ठिकाणी दोन जिल्ह्यांसाठी एकच बँक कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. आर्थिक व्यवहार्यता तपासूनच बँकांचे विभाजन करण्यात येणार असल्याचे सवदी यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात जुन्या धारवाड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून हावेरीसाठी स्वतंत्र बँक स्थापन करण्यात येईल. केवळ चार विधानसभा मतदारसंघ असलेला गदग जिल्हा धारवाड बँकेसोबतच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रायचूर आणि कोप्पळ बँकांचे विभाजन करून कोप्पळसाठी स्वतंत्र बँक स्थापन केली जाईल आणि त्याला निम्मा हिस्सा दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Tags: