हुक्केरी तालुका पंचायत सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची प्रगती आढावा बैठक झाली. यावेळी तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या योजनांबाबत आणि समस्यांबाबत कंत्राटदारांसह बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र, अण्णिगेरी हे एकमेव अधिकारी बैठकीला उपस्थित राहिल्याने मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.


मदिहळ्ळी गावातील सर्वे क्रमांक ४८ मधील दोन एकर जागेवर असलेल्या सुमारे ११५ घरांसाठी स्वतंत्र उपग्रामाची निर्मिती करावी, तसेच रस्त्याचे डांबरीकरण आणि गटार बांधकाम करावे, अशी मागणी बहुसाहेब पांद्रे यांनी निवेदनाद्वारे केली.
मोदगा गावातील नूतन ग्राम सहाय्यक मयुरी पाटील यांना तसेच मतदारसंघातील नवनियुक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले.

के. एम. नागनूर गावातील अंगणवाडी सेविका नियुक्ती प्रक्रियेत पात्रता नसलेल्या व्यक्तींना पैसे घेऊन नियुक्ती दिल्याचा आरोप परशुराम नाईक यांनी केला. याची दखल घेत मंत्र्यांनी महिला व बालकल्याण विभागाचे सहायक संचालक शिवमूर्ती यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
पाश्चापूर गावातील विद्यार्थ्यांच्या बससेवेच्या गैरसोयीबाबत चर्चा सुरू असताना हुक्केरी आगार व्यवस्थापक चेतन साणिकोप्प बैठकीला अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. यावर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून त्यांना तातडीने बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. मात्र, बैठक संपेपर्यंत आगार व्यवस्थापक उपस्थित झाले नाहीत. तालुकास्तरीय बैठकांची माहिती देऊनही आगार व्यवस्थापक उपस्थित राहत नसल्याची बाब पंचायत अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यानंतर मंत्र्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीला महादेव पटोळी, किरणसिंग राजपूत, जंगलीसाहेब नाईक, महांतेश मगदूम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
\\*राजू बागलकोटी इन न्यूज, हुक्केरी\\*


Recent Comments