Belagavi

कर्नाटकातील मराठा समाजाच्या संघटनासाठी डिजिटल नोंदणी अभियान

Share

कर्नाटकातील मराठा समाजाला एकाच व्यासपीठावर आणून समाजाचे संघटन आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘सकल मराठा समाज कर्नाटक’तर्फे अभियान हाती घेण्यात आले आहे. किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली या अभियानांतर्गत डिजिटल नोंदणी आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानाची तयारी करण्यात आली आहे.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना किरण जाधव यांनी समाजातील ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची शक्ती एकत्र आणून सक्षम समाजाची निर्मिती करणे हे अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व मराठा बांधवांना एकाच व्यासपीठावर जोडण्यासाठी ‘सकल मराठा समाज नोंदणी ॲप’ विकसित करण्यात आले आहे. यासोबतच यंदापासून ‘वीरमाता जिजाऊ पुरस्कार’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुमारे १५० ज्येष्ठ कर्तृत्ववान व्यक्तींसह पाच ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पूज्य स्वामीजी आणि समाजातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२७च्या दुसऱ्या आठवड्यात भव्य पुरस्कार वितरण आणि नागरिक सन्मान सोहळा आयोजित करण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून समाजातील तरुणांना रोजगार मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण आणि गरजू व्यक्तींना मदत अशा सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने राबविण्यात येणार आहे. समाजातील सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून या संघटनात्मक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी माधुरी जाधव, सतीश बाचिकर, निवृत्त कॅप्टन डॉ. चांगप्पा पाटील, शशिकांत रणदिवे, राजन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: